You are currently viewing ‘आपले गुरुजी’ वर्गात फोटो लावण्याच्या निर्णयाला शिक्षक भारतीचा तीव्र विरोध !

‘आपले गुरुजी’ वर्गात फोटो लावण्याच्या निर्णयाला शिक्षक भारतीचा तीव्र विरोध !

शिक्षकांचा अवमान करण्याचा शासनाचा घाट! शिक्षकांमधून संतापाची लाट

 

तळेरे:- प्रतिनिधी

 

” आपले गुरुजी” या नावाने संबंधित शिक्षकांचा फोटो त्या त्या वर्गामध्ये प्रदर्शित करणेबाबत. शिक्षण आयुक्तांनी सुचना देऊन कार्यवाही करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले आहेत.या शासनाच्या निर्णयाला सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी तीव्र विरोध केला असून शासनाचा या कृतीतून शिक्षकांचा जाणीवपूर्वक अवमान करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची तीव्र भावना त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात व्यक्त केली आहे.

दि. २४ ऑगस्ट च्या व्हि.सी मध्येआयुक्तांनी “आपले गुरुजी” या नावाने संबंधित शिक्षकांचा फोटो त्या त्या वर्गामध्ये सन्मानपूर्वक प्रदर्शित करणेबाबत सूचना दिल्या आहेत. या संदर्भात मंत्रिमंडळात चर्चा झाली असून दोन आठवडयात याबाबत पूर्तता करावी. व संबंधित शिक्षणाधिकारी यांनी पडताळणी करुन अहवाल सादर करावा असे शालेय शिक्षण सचिव यांनी निर्देश दिले आहेत. कोल्हापूर विभागातील विविध जिल्हयातील अधिनस्त असणा-या सर्व शाळांमध्ये वरील विषयाबाबत कार्यवाही झाली किंवा कसे याबाबत समक्ष शाळांना भेट देऊन कार्यवाहीचा अहवाल शासनास, संचालनालयास व या कार्यालयास अवगत करावा. विलंब होणार नाही यांची दक्षता घ्यावी असेही दि. २५ ऑगस्ट रोजी शिक्षक उपसंचालक यांनी सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना काढलेल्या पत्रात नमूद आहे.

यात नमूद केल्याप्रमाणे शिक्षकांचा ए-४ साईज रंगीत फोटो वर्गात लावणे म्हणजे हास्यास्पद असून, विद्यार्थी आणि शिक्षकांचे अतुट नाते असते.शाळेतील प्रत्येक विद्यार्थी हा संबंधित शिक्षकांना ओळखत असतो तरीही ‘आपले गुरूजी’ म्हणुन वर्गात फोटो लावून शासन कशासाठी उठाठेव करतंय? असा प्रश्न जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी विचारला आहे. ते पुढे म्हणतात की, एखाद्या विद्यार्थ्याकडून

वर्गातील या फोटोची विटंबना होण्याचा प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याला जबाबदार कोण?असा सवाल ही शिक्षक भारतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केला आहे. शिक्षकांवर अन्याय करणारा निर्णय त्वरित रद्द करावा अन्यथा शिक्षक भारतीला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशाराही सिंधुदुर्ग शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा