You are currently viewing महापालिका क्षेत्रातील बंद पाणी मीटर बदलण्याची मोहीम हाती; नळधारक नागरिकांनी सहकार्य करावे

महापालिका क्षेत्रातील बंद पाणी मीटर बदलण्याची मोहीम हाती; नळधारक नागरिकांनी सहकार्य करावे

शासनाच्या विशेष निधीतून जलमापक यंत्रे बदलण्याची कार्यवाही; नियुक्त कंपनीमार्फत यांत्रिक पाणी मीटर बसविण्यात येणार

सांगली / प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार :

सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील ज्या नळधारक ग्राहकांची पाणी जलमापक यंत्रे (वॉटर मीटर) बंद अथवा नादुरुस्त स्थितीत आहेत, अशा ग्राहकांची जलमापक यंत्रे बदलण्याची कार्यवाही महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत हाती घेण्यात येत आहे. यासाठी संबंधित नळधारक नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनास आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये ‘महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी-सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद’ या योजनेअंतर्गत सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक कामांमध्ये जलमापक यंत्रे पुरविणे व बसविणे या कामासाठी १२ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे.

या अनुषंगाने आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय मान्यता प्राप्त करून ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून, जलमापक यंत्रे पुरविणे व बसविण्याची कामगिरी मे. एक्सेलसोअर्स इंटरनॅशनल लि., बडोदरा या नियुक्त कंपनीमार्फत करण्यात येणार आहे.

बंद जलमापक यंत्रांच्या जागी नवीन यांत्रिक मीटर या कामांतर्गत महानगर पालिका क्षेत्रातील बंद अथवा नादुरुस्त जलमापक यंत्रांच्या जागी नवीन यांत्रिक स्वरूपाची जलमापक यंत्रे बसविण्यात येणार आहेत. यामुळे पाणीवापराची नोंद अधिक व्यवस्थित होण्यास तसेच पाणीपुरवठा व्यवस्थापनात सुधारणा करण्यास मदत होणार आहे.

नियुक्त कंपनीच्या प्रतिनिधींमार्फत जलमापक यंत्रे बदलण्याची कार्यवाही करण्यात येईल. या वेळी संबंधित नळधारक ग्राहकांनी पाणी मीटर जोडणी दाखल्यावरील ग्राहकाचे नाव, पत्ता, नळजोडणी क्रमांक व इतर संबंधित माहिती योग्य असल्याची खात्री करूनच दाखल्यावर स्वाक्षरी करावी. सदर दाखल्याची एक प्रत संबंधित ग्राहकास देण्यात येईल.

महानगरपालिका क्षेत्रातील ज्या नळधारक ग्राहकांची जलमापक यंत्रे बंद स्थितीत आहेत, त्यांनी नियुक्त प्रतिनिधींना जलमापक यंत्र बदलण्यासाठी आवश्यक सहकार्य करावे. तसेच मीटर बदलण्याची कार्यवाही झाल्यानंतर संबंधित दाखल्यावरील नोंदी तपासून खात्री करावी.

पाणीपुरवठा व्यवस्थेचची कार्यक्षमता वाढविणे, पाणीवापराची अचूक नोंद ठेवणे आणि नागरिकांना अधिक सक्षम पाणीपुरवठा सेवा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

तरी सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व संबंधित नळधारक नागरिकांनी या कामास सहकार्य करावे, असे आवाहन श्री. सुशांत कुलकर्णी, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा