नागपूर :
शुभंकरोति साहित्य परिवारच्या माध्यमातून २१ नोव्हेंबर २०२६ रोजी नागपूर येथे रसिकोत्सव मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन होत आहे. विदर्भाचे सांस्कृतिक नेते आणि समाजसेवक रसिकाग्रणी मा. डॉ. गिरीश गांधी संमेलनाध्यक्षपदी राहणार असून, उद्घाटक म्हणून इमव्हर्स ए-आयच्या संस्थापक अध्यक्ष आणि साहित्य रसिक मा. प्रीती रामकृष्णन राहतील.
प्रामाणिक साहित्य रसिक हा अव्यक्त प्रतिभावंतच असतो अशी भूमिका घेणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे महाकवी मा. डॉ. सुधाकर गायधनी यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार मा. विकास झाडे, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
नवोदित साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत मराठी साहित्याचा प्रचार, प्रसार आणि वाचनसंस्कृतीच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या शुभंकरोति साहित्य परिवार मुंबई, या संस्थेच्या वतीने या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘रसिकोत्सव २०२६’ असे या संमेलनाचे नामकरण करण्यामागची भूमिका म्हणजे साहित्य रसिकांमधूनच या संमेलनाचे अध्यक्ष, उद्घाटक या मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. अशाप्रकारचे हे कदाचित साहित्य विश्वातील पहिलेच संमेलन असावे.
संमेलनाच्या स्वागताध्यक्षापदी डॉ. माया दिलीप यावलकर राहतील. कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी मा. श्रीनिवास नार्वेकर, तर गझलरंग कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी कोकण विभाग पत्रकार संघाचे अध्यक्ष मा. संजय हंडोरे पाटील हे मान्यवर राहतील.
याप्रसंगी साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय रसिक आणि साहित्यिकांच्या योगदानाची दखल घेत सहा मान्यवरांना ‘शुभंकरोति गुणगौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये मा. राजश्री पाटील, मा. सना पंडित, डॉ. मेधा कानेटकर, न्यायमूर्ती मा. किशोर रोही, डॉ. मीना सु. बंदे आणि मा. धनश्री कि. पाटील यांचा समावेश आहे.
वाचनाची आवड जोपासण्यासाठी आणि वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी शुभंकरोति साहित्य परिवारातर्फे महिनाभर ‘वाचनयात्रा’ हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमातील उल्लेखनीय सहभागाच्या आधारे वाचकांना ‘वाचनरत्न पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.
याशिवाय महाकवी डॉ. सुधाकर गायधनी यांच्या ‘महाकाव्य समग्र देवदूत’ या जगप्रसिद्ध महाकाव्याचे समूहामध्ये अभिवाचन करणाऱ्या मान्यवरांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात येईल.
समूहात सातत्याने उत्तम कार्य करणाऱ्या आणि आपल्या लेखनातून साहित्यसेवा करणाऱ्या गुणीजनांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
मराठीचे वैभव संत गाडगेबाबा, श्री चक्रधर स्वामी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या या पावन विदर्भभूमीत होणाऱ्या या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून साहित्यिक, पत्रकार, कवी, गझलकार, वाचक आणि साहित्य रसिकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देणे, वाचनसंस्कृती रुजविणे आणि मराठी साहित्याची समृद्ध परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे, हा या संमेलनाचा प्रमुख उद्देश आहे.
शुभंकरोति साहित्य परिवाराच्या संस्थापिका आणि प्रमुख मार्गदर्शीका सौ. सोनाली जगताप, मुख्य प्रशासिका डॉ. माया दि. यावलकर, अध्यक्षा प्रा. सुमती पवार आणि प्रशासक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली संमेलनाची तयारी अतिशय उत्साहाने सुरू आहे. विदर्भ-नागपूरातील साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ‘रसिकोत्सव २०२६’ यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
