प्रतिकूल परिस्थितीतही शिवसैनिक पुन्हा शिवसेना उभारतील त्याची सुरुवात तिथवली शाखेपासून झाली- मा.आ. वैभव नाईक
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तिथवली शाखेचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न
वैभववाडी
तिथवली शाखेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला शिवसैनिक आणि जनतेच्या लाभलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे तिथवली शाखा ही गावापुरती मर्यादित राहिली नाही तर आम्हा सर्व शिवसैनिकांना ऊर्जा देणारा हा कार्यक्रम ठरला आहे. शिवसेना हा संघर्ष करणारा पक्ष आहे. आजच्या प्रतिकूल परिस्थितीतही शिवसैनिक जोमाने काम करून पुन्हा शिवसेना उभारतील याची सुरुवात तिथवली शाखेपासून झाली आहे. या शाखेच्या माध्यमातून गावातील नागरिकांचे प्रश्न सोडविले जातील असा विश्वास कुडाळ मालवणचे माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी व्यक्त केला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वैभववाडी तालुक्यातील तिथवली शाखेचा उद्घाटन सोहळा सोमवारी मोठया उत्साहात संपन्न झाला. या उद्घाटन सोहळ्याला शिवसेना नेते, माजी खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेते अरुण दूधवडकर, माजी आमदार तथा सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, सिंधुदुर्ग लोकसभा संपर्कप्रमुख प्रदीप बोरकर, कणकवली विधानसभाप्रमुख तथा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, रत्नागिरी जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम, धारावी विधानसभा प्रमुख वसंत नकाशे, मुंबईचे नगरसवेक किरण तावडे, रत्नागिरी उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस यांची प्रमुख उपस्थिती होती.
वैभव नाईक पुढे म्हणाले, आपले सर्व सहकारी सोडून गेले तरी देखील सुशांत नाईक हे जबाबदारीने कणकवली विधानसभा मतदारसंघात काम करत आहेत. लोकांच्या गाठीभेटी घेत असून त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न ते करत आहेत. त्याबद्दल आम्हा सर्वांना त्यांचे कौतुक आहे. आज महाराष्ट्रात आणि सिंधुदुर्गात जे चुकीच्या पद्धतीने राजकारण सुरू आहे. त्याला विरोध करण्याचे काम आपण केले पाहिजे. सिंधुदुर्गातील जमिनी परप्रांतीयांना विकण्याचे काम सत्ताधारी करत आहेत. त्याला आपण विरोध केला पाहिजे. सिंधुदुर्ग वाचविण्यासाठी या मातीत घट्ट पाय रोवून आपल्याला काम करायचे आहे. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना जिल्ह्यात आम्ही शासकीय मेडिकल कॉलेज, चिपी विमानतळ, महिला बाल रुग्णालय उभारले आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली. शेतकऱ्यांना, मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्यात आली. आम्ही सत्तेत असताना लोकोपयोगी कामे केली. परंतु आत्ताचे सत्ताधारी अदानीचे स्मार्ट मीटर बसविण्याचे टार्गेट पूर्ण करत आहेत. विनाशकारी प्रकल्प जिल्ह्यात आणत आहेत. गेल्यावर्षीची आणि यावर्षीची भात पिकाची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत मिळाली नाही आणि पालकमंत्री मात्र सिंधुदुर्गातील आठही तालुक्यात माझ्यामुळेच दुष्काळ जाहीर झाल्याचे इव्हेंट करून सांगत आहेत. आम्ही सुरू केलेले विमानतळ महायुतीची सत्ता आल्यानंतर तीन वेळा बंद पडले आता बंद झालेली विमान फेरी पुन्हा सुरू करून पालकमंत्री आपणच विमानतळ सुरू केल्याचा आव आणत आहेत. त्याचबरोबर मोठा इव्हेंट करून रो- रो बोट सेवा पालकमंत्र्यांनी सुरू केली परंतु ती पहिल्याच महिन्यात बंद पडली. हे सर्व ते केवळ प्रसिद्धीसाठी करत आहेत. शाश्वत विकासाचे कोणतेही काम सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून झालेले नाही. वैभववाडीत साखर कारखाना सुरू करतो अशी घोषणा त्यांनी केली होती त्याला आता दहा वर्ष झाली तरी साखर कारखान्याचा साधा बोर्ड देखील लागला नाही अशी टीका वैभव नाईक यांनी केली.
यावेळी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण रावराणे, वैभववाडी तालुकाप्रमुख नंदू शिंदे, तालुका संपर्कप्रमुख विठ्ठल बंड, युवासेना तालुकाप्रमुख रोहित पावसकर, उत्तम लोके, राजापूर विधानसभाप्रमुख तात्या सरवणकर, राजापूर तालुकाप्रमुख कमलाकर कदम, सहसंपर्कप्रमुख पंढरीनाथ तावडे, उपजिल्हा समन्वयक वसंत खानविलकर, तालुका सचिव गुलजार काझी, तालुका संघटक बाबा मोरे, महिला आघाडीप्रमुख दिव्या पाचकुडे, लक्ष्मीप्रभा जाधव, अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख जावेद पाटणकर, उपतालुका प्रमुख संतोष पाटील, विभागप्रमुख जितेंद्र तळेकर, तिथवली शाखाप्रमुख चिंतामण जैतापाकर, बाळू हर्याण, भारती सरवणकर, सुरेश सरवणकर, गोट्या कोळसुलकर, यशवंत गव्हाणकर, स्वप्नील रावराणे, प्रसाद नारकर, मधुकर इरवळकर, प्रमोद हर्याण आदि शिवसैनिक उपस्थित होते.
