*मत्स्यपालन रोगनिदान, कोळंबीच्या आरोग्य व्यवस्थापनाचा घेतला आढावा*
आंध्र प्रदेश : महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसाय अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मंत्री नितेश राणे यांनी आंध्र प्रदेशातील कोव्वाडा येथील आनंदा ॲडव्हान्स ॲक्वा लॅबच्या प्रादेशिक संशोधन व विश्लेषण प्रयोगशाळेला भेट दिली. मत्स्यव्यवसाय अभ्यास दौऱ्याचा भाग म्हणून झालेल्या या भेटीत मत्स्यपालनातील रोगनिदान, पाणी आणि मातीच्या गुणवत्तेची तपासणी तसेच कोळंबीच्या आरोग्य व्यवस्थापनाबाबत माहिती घेण्यात आली.
या भेटीदरम्यान राणे यांनी प्रयोगशाळेतील तज्ज्ञांशी सविस्तर चर्चा केली. मत्स्यपालनात उद्भवणाऱ्या रोगांचे निदान, सूक्ष्मजीवशास्त्रीय विश्लेषण, पाण्याच्या गुणवत्तेचे निकष आणि जैवसुरक्षेच्या उपाययोजनांचा यावेळी आढावा घेण्यात आला. मत्स्यपालनातील संभाव्य धोके वेळेत ओळखण्यासाठी प्रयोगशाळेच्या चाचण्या आणि वैज्ञानिक माहिती किती महत्त्वाची आहे, याची माहितीही या वेळी देण्यात आली.
वेळेवर रोगनिदान आणि योग्य तांत्रिक मार्गदर्शन मिळाल्यास मत्स्यपालकांना कोळंबी व माशांचे जगण्याचे प्रमाण वाढवणे, उत्पादनातील नुकसान कमी करणे आणि उत्पादकता सुधारण्यास मदत होऊ शकते. या अनुषंगाने प्रयोगशाळेच्या कार्यपद्धती आणि उपलब्ध परीक्षण सुविधांची माहिती घेण्यात आली.
या अभ्यास दौऱ्यातून मिळालेल्या अनुभवांचा उपयोग महाराष्ट्रातील मत्स्यपालनासाठी तांत्रिक मार्गदर्शन सेवा मजबूत करण्यासाठी, रोगनिदान व परीक्षण सुविधांचा विस्तार करण्यासाठी आणि वैज्ञानिक पद्धतीने मत्स्यव्यवसायाचे व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी होऊ शकतो.
या भेटीदरम्यान आनंदा समूहाचे अध्यक्ष यू. के. विश्वनाथ राजू, महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव एन. रामास्वामी, महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय आयुक्त भानुदास पालवे, महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खापले, मत्स्यव्यवसाय तज्ज्ञ मनोज शर्मा, अतिरिक्त आयुक्त महेश देवरे, नागनाथ भादुले यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
