मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये एड्स जनजागृतीपर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन!
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडी येथे दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा एड्स नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय तसेच उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने एचआयव्ही/एड्स जनजागृतीपर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये एचआयव्ही/एड्सविषयी शास्त्रीय दृष्टिकोन निर्माण करणे, या आजाराबाबत असलेले गैरसमज दूर करणे तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत योग्य माहिती देणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
या कार्यक्रमात उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडीचे कौन्सिलर श्री. सुनील सोन्सुरकर यांनी विद्यार्थ्यांना एचआयव्ही आणि एड्स यातील फरक, एचआयव्हीचा संसर्ग होण्याचे मार्ग, संसर्गास कारणीभूत ठरणारे घटक, संभाव्य लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय तसेच आवश्यक ती दक्षता याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. एचआयव्हीविषयी समाजात आजही आढळून येणारे अनेक गैरसमज आणि चुकीच्या समजुती यामुळे बाधित व्यक्तींना सामाजिक भेदभावाला सामोरे जावे लागते. त्यामुळे एचआयव्ही/एड्सविषयी अचूक व वैज्ञानिक माहिती प्रत्येकाने जाणून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मार्गदर्शनादरम्यान विद्यार्थ्यांना एचआयव्हीचा संसर्ग कशामुळे होतो आणि कशामुळे होत नाही, याबाबत स्पष्ट माहिती देण्यात आली. दैनंदिन सहवास, एकत्र बसणे, हात मिळवणे, मिठी मारणे, एकत्र भोजन करणे किंवा डास चावल्यामुळे एचआयव्हीचा संसर्ग होत नाही, अशा महत्त्वाच्या बाबी स्पष्ट करून विद्यार्थ्यांच्या मनातील गैरसमज दूर करण्यात आले. तसेच संसर्ग टाळण्यासाठी सुरक्षित आणि जबाबदार वर्तन, योग्य माहितीचा प्रसार आणि आवश्यकतेनुसार वैद्यकीय सल्ला घेण्याचे महत्त्व सांगण्यात आले.
तसेच एचआयव्ही बाधित व्यक्तींशी भेदभाव न करता त्यांच्याबद्दल संवेदनशीलता, सहानुभूती आणि माणुसकीची भूमिका ठेवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले, कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले, विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, मंडळाचे संचालक श्री. दिलीप देसाई, सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री. जयप्रकाश सावंत व डॉ. सतीश सावंत , मुख्याध्यापिका श्रीम. अनुजा साळगांवकर व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले.
