You are currently viewing फोंडाघाटात ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात विसर्जन मिरवणूक

फोंडाघाटात ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात विसर्जन मिरवणूक

फोंडाघाटात ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात विसर्जन मिरवणूक

ढोल-ताशे, बेंजोच्या तालावर अबालवृद्धांचा उत्स्फूर्त सहभाग; सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांच्याकडून टोपी वाटप

फोंडाघाट : प्रतिनिधी

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात फोंडाघाट येथे गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात पार पडली. बाप्पाला निरोप देताना एका डोळ्यात हसू तर दुसऱ्या डोळ्यात आसू, असे भावनिक वातावरण मिरवणुकीत पाहायला मिळाले.
फोंडाघाट बाजारपेठेतून निघालेल्या या मिरवणुकीत अबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल-बेंजोच्या तालावर नाचत-गाजत गणरायाला निरोप देण्यात आला. विविध वाहनांमधून सजवून नेण्यात आलेल्या गणेशमूर्ती, फटाक्यांची आतषबाजी आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषामुळे संपूर्ण बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिरवणुकीदरम्यान भजनाचेही सादरीकरण करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी सहभागी भाविकांना टोप्यांचे वाटप केले. गणेश विसर्जनाची मिरवणूक उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडल्याबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा