You are currently viewing नागरिकांनी घरगुती कचऱ्यापासून खत निर्मिती करावी : नगराध्यक्षा काजल म्हेत्रे

नागरिकांनी घरगुती कचऱ्यापासून खत निर्मिती करावी : नगराध्यक्षा काजल म्हेत्रे

विटा / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :

विटा नगरपरिषद वतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२६, माझी वसुंधरा ७.० आणि ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत शहरात घरगुती कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन व कचऱ्या पासून खत निर्मितीबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

नगराध्यक्षा काजल म्हेत्रे, उपनगराध्यक्ष अमोल बाबर, आरोग्य सभापती, भालचंद्र कांबळे आणि मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत हजारे मळा येथील विद्याराणी भिंगारदेवे यांनी घरगुती कचऱ्यापासून शास्त्रोक्त पद्धतीने खत निर्मिती केली आहे. विटा नगरपरिषदेच्या माहिती, शिक्षण व जनजागृती (IEC) विभागाच्या माध्यमातून ‘होम कंपोस्टिंग’ची शास्त्रोक्त पद्धत, कचऱ्याचे योग्य वर्गीकरण तसेच घरच्या घरी ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती कशी करावी, याबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी नगराध्यक्षा काजल म्हेत्रे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “घरगुती कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करून ओल्या कचऱ्याची घरच्या घरी विल्हेवाट लावणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. होम कंपोस्टिंगच्या माध्यमातून ओल्या कचऱ्यापासून उत्तम सेंद्रिय खत तयार करता येते. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घरात होम कंपोस्टिंगचा अवलंब करून विटा शहर स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक बनविण्यासाठी नगरपरिषदेला सहकार्य करावे.”

घरगुती पातळीवर ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया केल्यामुळे कचरा संकलन व वाहतुकीवरील भार कमी होण्यास मदत होते. तसेच तयार होणाऱ्या सेंद्रिय खताचा वापर घरातील झाडे, बागा व परस बागेसाठी करता येतो.

यावेळी आयईसी विभागप्रमुख नितीन चंदनशिवे, सुरज मंडले, महेश झाडे, साक्षी जाधव,प्रमोद भोसले, विजय चंदनशिवे, शुभम मोहिते, साक्षी सगरे व प्रीती साळुंखे, अभि गायगवळे, विद्याराणी भिंगारदेवे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा