You are currently viewing माझी खाद्य संस्कृती

माझी खाद्य संस्कृती

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी राजा जोशी लिखित अप्रतिम लेख*

 

*माझी खाद्य संस्कृती*

*भाग- १*

 

उगाच हरखून जाऊ नका.

इथे काही तुम्हाला फूड जँक्षणची यादी वगैरे काही मिळणार नाहीए ,कारण ही  माझी खाद्य संस्कृती आहे

 

माझी म्हणण्याचं कारण हेच की हॉटेलिंग करण्यासाठी लागणारा *पॉकेटमनी* नावाचा प्रकार

तेंव्हा अस्तित्वातच नव्हता.

म्हणजे आमच्या पालकांच्या लेखी अस्तित्वात नव्हता.

आणि आम्हाला तर त्याचे स्पेलिंगही ठाऊक नव्हते.

 

याचा अर्थ असा नव्हे की आम्ही हॉटेलिंग केलेच नाही.

केले, अगदी *ताजमहल आणि ओबेरॉय शेरेटेन* मध्ये केले .

अगदीच आत जाऊन बसलो नव्हतो,पण ह्याच हॉटेलांच्या मागच्या गल्लीत असलेल्या ठेल्यांवर खाललय.

तेथेच तीही माणसं भेटली जी रहात होती तिथं पण खात होती इथं.

त्यांच्याच पंक्तीला बसल्याने मलाही तिथे जेवल्याचाच फील मिळाला,

म्हणूनच म्हंटलं ताजमहल आणि ओबेरॉय शेरेटेन मध्ये हॉटेलिंग केलंय.त्याकाळी मी मुंबैत नोकरीत होतो.

 

पॉकेटमनी हा निर्माण करायचा असतो.ती एक कला आहे.

म्हणजे बघा त्या काळी वाणसामान महिन्याभराचे भरुन ठेवीत नसत.ते रोजचे रोज किंवा गरजेप्रमाणे आणले जायचे.अर्थात ती जबाबदारी आस्मादिकांची.

पावकिलोची किंमत विचारायची प्रत्यक्ष दोनशे ग्रॅम बांधायला सांगायचे.घरी पावकिलो म्हणून बिनदिक्कत सांगायचे.

 

आजकाल महिना भराचे सामान भरण्याचे नादात ही पॉकेटमनी निर्मितीची कला इतर अनेक कलांप्रमाणे. अस्तंगत होऊ लागली आहे,

 

आणि एक हॉटेलिंग होतं.

जसे उडुपी हॉटेल्स नाशकात हातपाय पसरु लागली तशी एक कला आकार घेऊ लागली.

*मसाला डोसा, उत्तप्पा* वगैरे एका टेबलवर मागवायचा,बिल घ्यायचे आणि दुसऱ्या सेक्शन मधील टेबलवर बसून

*चहा* ऑर्डर करायचा बिल घ्यायचे.गल्ल्यावर फक्त चहाचे बिल देऊन बाहेर……

उदा.हॉटेल *सुरुची/एस.टी.कँटीन/पवन हॉटेल नाशिकरोड इ.इ.*

(या संदर्भात पवन हॉटेलमधून सहीसलामत सटकल्यावर *उपनगर* पर्यंत मागे वळून न पाहता आल्याची दंतकथा सांगितली जाते.अर्थातच आमचा पलायनवाद म्हणूनही सांगितली जाते)

आजकाल CCTV च्या अति वापरामुळे ,ही कलाही अस्तंगत होत चाललीय .

 

असो,तेंव्हा उघडपणे हॉटेलांत जायची शामत नव्हती.*अशोक स्तंभावरच्या दीपक रेस्टॉरंट* मधेही गेलोय, सतरा वेळा कुणी पहात नाहीये ना याची खात्री करून शिरायचो.करायचो काय तर एक चहा प्यायचो.

 

नाही म्हणायला नंतर नंतर *हॉटेल तृप्ती* मध्ये जायला लागलो.

ते *वडनगरेंच्या मालकीचे*.

वडनगरे म्हणजे आबालवृद्धांचे *पंत* .

त्यांचा चष्मा थोडा गडद रंगाचा आणि आकडेबाज मिशा.अगदी सहज संवाद सांधणारे त्यांचे काहीशा काळसर चष्म्या मागील डोळे.

सर्व वयोगटाशी त्यांची मैत्री.

तिथे फॅमिली रुम होत्या तीन.हा ऍडव्हानटेज.त्या काळी फॅमिली रुम आणि त्यांचे दरवाजे.

ओ माय गॉड!

ते वरुन आणि खालूनही कट साईजच असायचे.

*वि.आ.बुवांच्या किंवा चंद्रकांत काकोडकरांच्या* कादंबरीतल्या नायक नायिकांचे

एकमेकांत गुंतलेले पाय खालून दिसायचे त्या लेखकांना अगदी तसेच.

फक्त कादंबरीतच हं !.

प्रत्यक्षात कुठलं असं काही व्हायला?

 

काय म्हणता?, *बुवा आणि काकोडकर* वाचले नाहीत ?

मग काय *चांदोबा, काळापहाड नंतर डायरेक्ट ज्ञानेश्वरीच* हाती घेतली की काय ?

 

ही असली फॅमिली रुमं *निलम, महाराष्ट्र, कॅफे हिंद,प्रभात शेजारील एका हॉटेलात* होत्या,

तसेच *अशोक टॉकीज* समोरील एका हॉटेलात पण होत्या.

बहुतेक सामिष भोजनाचे ठिकाणी असत.त्यांचे आडून बरेच जण आपली हॉटेलिंगची हौस भागवून घेत.

त्यातल्या त्यात आम्ही *जोशी/कुलकर्णी* याचा फायदा उठवायचो.कारण आमच्या उंबऱ्याच्या आत सामिष अलाउड नव्हतं ना !

बरं आमच्या उंबऱ्याआड आम्ही काय खायचे हे ठरवणार कोण ?

तर ते, जे आमच्या उंबऱ्या बाहेर आहेत ते .

सध्या नाही म्हणायला कोविड महामारीत एक झालंय,

कोंबडीचं अंडं शाकाहारी झालंय म्हणे.आमच्याही फ्रिजमध्ये त्यानं स्थान मिळवलंय.

 

ऑम्लेट ची पण एक गंमतच आहे बघा केवळ दोन अंड्यांचं ऑम्लेट मोठ्या डिशभर पसरवण्याच कौशल्य

त्या *इराणी* हॉटेलवाल्यांचंच.

पण ऑम्लेट खावं ते *मित्र विहार कॅन्टीन* चंच.टोस्टर मधून टूनकर बाहेर आलेल्या स्लाइसवर

भरपूर अमूल क्रिम आणि चवीला बारीक चिरलेला कांदा विथ भुरभुरलेला मसाला.क्या बात है !

 

*हॉटेल निलम* मधल्या *साधुराम आणि मणी* यांचं काही वेगळंच स्थान होतं.ते नावाला वेटर होते.

मालकापेक्षाही जास्त यांचाच रुबाब.

त्यातल्या त्यात साधुरामला तर काही सांगावच लागत नसे.

तो योग्य ती सामग्री न सांगता आणून ठेवी.

योग्य वेळी ऑर्डर न देताही जेवण.

अगदी न चुकता बिलही आणून ठेवी ते ही *काशीनाथ* च्या पुढ्यातच.

तो एकटाच नोकरदार होता, *एस.बी.आय.* चा .

तुझं माझं असं काही नव्हतं तेंव्हा.आणि *काशा* काय परका हाय व्हय आपल्याला ?

 

नुसतं हॉटेलिंग म्हणजे खाद्य संस्कृती नव्हे ?

आणि नुसतं नॉन व्हेज म्हणजे खाद्य नव्हे.

 

घरगुती मसाला कष्टाने बनवायचा आणि प्रेमाने आग्रह कर करून खाऊ घालायचं .ही खरी संस्कृती.

*सद्या तावडे* च्या घरी नवीन वर्षाचा मसाला बनवला की प्रथम चाखण्याचा मान आमचाच.

तीच गत *अनिल महाजन* च्या घरीही.

नुसता मसाल्याचा वास आला की ताट घेऊन बसायचं.

काय चव होती ती यंव रे यंव .

ते *एम.डी.एच.* आणि *एव्हरेस्ट* वाले झक मारतील त्यांचे पुढे!

धन्य त्या गृहिणी ज्यांनी प्रेमभरे आम्हाला भरपेट खाऊ घातले.

 

*शऱ्याची आई,सद्याची बहीण ताराबाई, अन्याची आई,राजूंना बुंदी द्या म्हणणारा अन्याचा मामा,कामे वहिनी*

एक ना दोन अशा अनेक माऊलींनी माझ्या जिभेचे चोचले पुरवले.

आज काळाआड गेलेल्या त्या सर्वांना माझी ही खाद्य संस्कृती समर्पित .

 

राजा जोशी

9823687519

 

〰️🌸〰️🌸〰️🌸〰️

प्रतिक्रिया व्यक्त करा