आटपाडी / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) : आटपाडी तालुक्यात सध्या दुष्काळी परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. मात्र, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी यासंदर्भात दुष्काळाला तोंड देणाऱ्या नियोजनाची बैठक घेतली नाही. आमदारानी २८ सप्टेंबर अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घ्यावी अन्यथा मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांचे पुतळे माणगंगा नदीच्या पुलावरून कोरड्या पात्रात सोडण्याचे आंदोलन करण्याचा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेने दिला आहे.
बळीराजा शेतकरी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उन्मेश देशमुख आणि पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात महसूल विभागाला निवेदन दिले. आमदार सुहास बाबर यांनी दुष्काळाच्या संदर्भात स्थानिक पातळीवरती बैठक घेऊन उपाय योजनेचे नियोजन करायला हवे होते मात्र त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतल्याने नाराजी व्यक्त केली आहे.
“आमदारांनी आटपाडी तालुक्याची आढावा बैठक प्रत्यक्ष आटपाडीमध्ये घेऊन ठोस उपाययोजना संदर्भात प्रशासनाला सूचना द्यायला हव्या होत्या. मात्र ही आढावा बैठक थेट जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. त्यामुळे आता तालुक्यातील सक्षम अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घ्यावी आणि नियोजन करावे.
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिवसा सलग ८ तास वीज द्यावी, कोणतीही अट न घालता सरसकट कर्जमाफी जाहीर करावी तसेच तालुक्यात चारा छावण्या आणि पाण्याच्या टँकरबाबत नियोजन करावे, आटपाडी तालुक्याच्या उत्तर भागातील टेंभू विस्तारीकरणाचे काम झाले ते चुकीचे झाले आहे. त्याची तांत्रिक माहिती घेऊन ते काम दुरुस्त करावे, अशी मागणी केली आहे. यावेळी डी. एम. पाटील , डॉ. दिगंबर मोरे, अशोक गायकवाड, कंकर मुलानी, किसन वाघमारे, सत्तारभाई मुलानी, दादासाहेब पवार, गंगाधर भोसले, उत्तमबाबा गाढवे, मोहनराव खरात, गुलाब खरात, संजय ढोक, भारत काळेल आणि राजाराम काळेल यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
