You are currently viewing शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुखांच्या पापळ शाळेतील तील विद्यार्थ्यांच्या ‘कलेक्टर’ होण्याच्या स्वप्नांना मिळणार नवी दिशा!

शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुखांच्या पापळ शाळेतील तील विद्यार्थ्यांच्या ‘कलेक्टर’ होण्याच्या स्वप्नांना मिळणार नवी दिशा!

 

पापळ, ता. नांदगाव खंडेश्वर : ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांमध्येही मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती प्रत्यक्षात साकारण्याची क्षमता असते. मात्र योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळणे ही त्यासाठीची महत्त्वाची गरज असते. हीच गरज लक्षात घेऊन शिक्षणमहर्षी व माजी केंद्रीय कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगाव असलेल्या पापळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच स्पर्धा परीक्षा, एमपीएससी व यूपीएससीच्या माध्यमातून अधिकारी होण्याची दिशा मिळावी, या उद्देशाने एक अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. शाळेतील उपक्रमशील आणि उच्चाविद्याविभुषित शिक्षक डॉ. अजय मुरादे यांनी यासाठी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना या मोफत मार्गदर्शन सत्राचा फायदा करून दिला. यासाठी

 

डॉ. पंजाबराव देशमुख IAS अकादमी, अमरावती यांच्या माध्यमातून शाळेत विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. या सत्रासाठी अकादमीचे संचालक प्राध्यापक डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांना कलेक्टर होण्यासाठी कोणत्या प्रकारचे शिक्षण, अभ्यास, सातत्य, वाचनाची सवय आणि नियोजन आवश्यक आहे, याबाबत अत्यंत सोप्या व विद्यार्थ्यांना समजेल अशा हसत खेळत आणि मनोरंजक पद्धतीने पद्धतीने मार्गदर्शन केले.

 

डॉ. पंजाबराव देशमुख IAS अकादमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इयत्ता दुसरीपासून पदवीपर्यंतच्या विविध शैक्षणिक स्तरांनुसार अभ्यासक्रम व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविला जात आहे. विद्यार्थ्यांच्या स्तरानुसार परीक्षा व सराव चाचण्यांचे आयोजन करून त्यांना भविष्यातील स्पर्धात्मक परीक्षांसाठी तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. आजवर या अकादमीला सुमारे ३०० IAS अधिकाऱ्यांनी भेट दिल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच ‘मीही अधिकारी होऊ शकतो’ हा आत्मविश्वास मिळावा, त्यांना एमपीएससी व यूपीएससीसारख्या स्पर्धात्मक परीक्षांची ओळख शालेय जीवनापासून व्हावी आणि भविष्यात अधिकारी होण्यासाठी आवश्यक असलेल्या अभ्यासाची दिशा समजावी, या उद्देशाने हा उपक्रम पापळ येथील जिल्हा परिषद शाळेत राबविण्यात येत आहे.

 

शाळेतील उच्चशिक्षित शिक्षक डॉ. अजय मुरादे यांनी पुढाकार घेऊन अकादमीचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांना शाळेत आमंत्रित केले. ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही अशा प्रकारचे मार्गदर्शन विनामूल्य उपलब्ध व्हावे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे डॉ. अजय मुरादे यांनी स्पष्ट केले.

 

शाळेत यापूर्वीपासूनच शिष्यवृत्ती व जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचे मार्गदर्शन केले जाते. आता त्यासोबतच विद्यार्थ्यांना भविष्यातील स्पर्धात्मक परीक्षांची दिशा मिळावी, यासाठी नियोजन करण्यात आले आहे. विशेषतः शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी या उपक्रमाचे स्वागत करून “आमच्या मुलांनाही अशा प्रकारचे मार्गदर्शन मिळावे”, अशी इच्छा व्यक्त केली.

 

या उपक्रमामुळे पालकांमध्येही आपल्या मुलांच्या भविष्यातील शिक्षणाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होत असून, महागड्या खासगी शिक्षणाच्या पलीकडेही जिल्हा परिषद शाळेतून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच स्पर्धात्मक परीक्षांची तयारी आणि अधिकारी होण्याचे स्वप्न साकार करण्याची संधी मिळू शकते, असा विश्वास निर्माण झाला आहे.

 

कार्यक्रमास केंद्रप्रमुख श्री. गजानन चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. शाळेचे मुख्याध्यापक श्री. गजानन लवंगे, शिक्षक श्री. राहुल बिंड सर, श्रीमती प्रणिता मनगुडे व श्रीमती सीमा राठोड हे डॉ. अजय मुरादे सर यांच्या सोबतीने वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शालेय तासिकेव्यतिरिक्त वर्षभर चालणाऱ्या विशेष अभ्यास सत्राचे नियोजन करून विध्यार्थ्यांकडून अभ्यास सराव करून घेणार आहेत.

 

“गावातील मुलांच्या डोळ्यांतील मोठी स्वप्ने ओळखून त्यांना योग्य दिशा देणे, हीच खरी शिक्षणाची ताकद आहे,” या विचारातून सुरू झालेला हा उपक्रम पापळ येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी भविष्यातील यशाची नवी वाट ठरणार असल्याची भावना पालक व उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा