मालवणच्या ग्रामदैवतांच्या पालखी सोहळ्याला भक्तिमय वातावरणात प्रारंभ!
श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण यांच्या जयघोषाने मालवण नगरी दुमदुमली; दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
मालवण
मालवण नगरीचे आराध्य दैवत श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण यांच्या ऐतिहासिक आणि पारंपरिक पालखी सोहळ्याला मंगळवारी भक्तिमय वातावरणात उत्साहात प्रारंभ झाला. ग्रामदैवतांच्या जयघोषाने आणि पारंपरिक वाद्यांच्या गजराने संपूर्ण मालवण नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.
पालखी दर्शनासाठी मालवण शहरासह पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी गर्दी केली आहे. मुंबई, पुणे तसेच अन्य शहरांत स्थायिक झालेले चाकरमानी आणि माहेरवाशिणीही ग्रामदैवतांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत.
शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या या सोहळ्याला मालवणच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनात विशेष महत्त्व आहे. पालखी दर्शनासाठी लागलेल्या रांगा, अखंड जयघोष आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादाने संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामदैवतांच्या चरणी नतमस्तक होत भाविकांकडून कुटुंबाच्या सुख-समृद्धीसह गावाच्या भरभराटीसाठी साकडे घातले जात आहे.
हा पालखी सोहळा म्हणजे मालवणवासीयांच्या श्रद्धेचा, एकजुटीचा आणि सांस्कृतिक अस्मितेचा अनोखा संगम ठरत आहे.
