आटपाडी : प्रदीप जोशी
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि वेळेत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आटपाडी येथील उपजिल्हा रुग्णालय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे या रुग्णालयाचे बांधकाम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी कामाला गती द्यावी. इमारतीच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड करू नये. तसेच रुग्णालय सुरू होताना आवश्यक असणारी वैद्यकीय उपकरणे आणि सुविधा उपलब्ध असतील, याचे नियोजन आतापासूनच करावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आटपाडी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या सुरू असलेल्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी आमदार सुहास बाबर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, वैद्यकीय अधीक्षक वृषाली राऊत यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
यावेळी रुग्णालयाच्या बांधकामाची सद्यस्थिती जाणून घेऊन आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम नियोजनानुसार आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण होणे आवश्यक आहे. बांधकाम करताना गुणवत्तेच्या निकषांचे काटेकोर पालन करावे. कामात अनावश्यक विलंब होणार नाही, याची दक्षता घ्यावी. संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून बांधकामाची गती वाढवावी, असे निर्देश त्यांनी दिले.
उपजिल्हा रुग्णालय कार्यान्वित झाल्यानंतर आटपाडी तालुक्यासह परिसरातील ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारासाठी दूरच्या शहरांमध्ये जाण्याची गरज कमी होणार आहे. स्थानिक पातळीवरच अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. या दृष्टीने रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय उपकरणे, उपचार साहित्य आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून घेण्याचे नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.
रुग्णालयाच्या कामासाठी वाढीव निधीची आवश्यकता भासल्यास शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल. बांधकाम किंवा प्रशासकीय प्रक्रियेत काही अडचणी असल्यास त्या संबंधित अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून द्याव्यात. अशा अडचणी सोडवून प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक सहकार्य केले जाईल, अशी ग्वाहीही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
दरम्यान, पिंपरी खुर्द येथील ग्रामस्थांनी गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सुरू करण्याची मागणी आरोग्यमंत्र्यांकडे केली. ग्रामीण भागातील नागरिकांना प्राथमिक उपचार आणि आरोग्य सेवा गावातच उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टीने ही मागणी महत्त्वाची असल्याचे लक्षात घेऊन आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी पिंपरी खुर्द येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास मंजुरी देण्याबाबतची कार्यवाही लवकरात लवकर करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
