You are currently viewing फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन दिवसांत दोन प्रसूती

फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन दिवसांत दोन प्रसूती

फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन दिवसांत दोन प्रसूती

महिला प्रसूती युनिट सुरू; सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी डॉ. यादव यांचे केले अभिनंदन

फोंडाघाट (प्रतिनिधी) :

फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला प्रसूती युनिट पुन्हा सुरू करण्यात आले असून, युनिट सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत दोन महिलांची सुरक्षित प्रसूती करण्यात आली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. यादव यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.

सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी हे आपल्या मित्राला कुत्रा चावल्याने उपचारासाठी फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले होते. त्यावेळी त्यांना डॉ. यादव यांच्याकडून महिला प्रसूती युनिट सुरू झाल्याची माहिती मिळाली. यानंतर दोन दिवसांत दोन प्रसूती झाल्याचे समोर आले.

फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात सुमारे २५ वर्षांपूर्वी डॉ. कुलकर्णी, डॉ. कर्मळकर आदी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या काळात प्रसूती सेवा सुरू होती. त्यानंतर काही काळ ही सेवा बंद होती. डॉ. यादव यांच्या नेतृत्वाखाली प्रसूती सेवा पुन्हा सुरू झाल्याने परिसरातील महिलांना मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे.

या कामाची माहिती अजित नाडकर्णी यांनी राज्याचे मंत्री नितेश राणे यांनाही दिली. डॉ. यादव यांच्या कार्याचा सन्मान करण्याबाबत नितेश राणे यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली असून, ‘डॉ. यादव यांनी असेच चांगले काम सुरू ठेवावे, आपण त्यांच्या पाठीशी आहोत,’ असा विश्वास दिल्याचे नाडकर्णी यांनी सांगितले.

फोंडाघाट व परिसरातील महिलांसाठी प्रसूती सेवा पुन्हा सुरू होणे ही महत्त्वाची बाब असून, प्राथमिक आरोग्य केंद्रातील या सुविधेमुळे ग्रामीण भागातील महिलांची गैरसोय कमी होण्यास मदत होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा