पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती अटकेत; कुडाळ पोलिसांची कारवाई
मानसिक व शारीरिक छळाचा आरोप; बीएनएस कलम १०८ अंतर्गत गुन्हा, आरोपीला आज न्यायालयात हजर करणार
कुडाळ :
कुडाळ शहरातील गणेशनगर परिसरात पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी पतीला अटक केली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपीला आज (बुधवारी) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
कुडाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी भूषण सुभाष सांगेलकर (वय ३९, रा. सांगेली, ता. सावंतवाडी, सध्या डोंबिवली पूर्व) यांनी फिर्याद दाखल केली आहे. मृत महिलेचे माहेरचे नाव सोनाली सुभाष सांगेलकर (वय ३६) असून विवाहानंतर त्यांचे नाव तन्वी सिद्धिविनायक कुडाळकर असे झाले होते. त्या फिर्यादीच्या धाकट्या बहिणी होत्या.
सुमारे १५ वर्षांपूर्वी तन्वी यांचा सिद्धिविनायक विष्णू कुडाळकर (वय ४२, रा. गणेशनगर, कुडाळ) याच्याशी प्रेमविवाह झाला होता. सुरुवातीला संसार सुरळीत सुरू असला तरी, आरोपीचे अन्य एका महिलेशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करून तन्वी यांनी जाब विचारल्यानंतर त्यांच्यावर मानसिक व शारीरिक छळ सुरू झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, आरोपी पत्नीवर संशय घेत शिवीगाळ व मारहाण करत असे. तसेच, माहेरच्या आई-वडील, भाऊ व इतर नातेवाईकांशी संपर्क ठेवण्यास मज्जाव करून भावाचा मोबाईल क्रमांकही ब्लॉक केल्याचा आरोप आहे. १८ जून २०२६ पासून छळाचे प्रमाण वाढल्याने तन्वी या तीव्र मानसिक तणावाखाली होत्या. या सततच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी कुडाळ पोलिसांनी संशयित सिद्धिविनायक विष्णू कुडाळकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १०८ अन्वये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात येणार असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गुरुदास पाडावे करीत आहेत.
दरम्यान, तन्वी कुडाळकर यांच्यावर मंगळवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे कुडाळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
