प्रगणना फॉर्मचे डिजिटायझेशन विहित मुदतीत १०० टक्के पूर्ण करा – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश
उत्कृष्ट काम करणाऱ्या BLO यांचा सत्कार
कणकवली मतदारसंघाची आढावा बैठक
सिंधुदुर्ग
भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision-SIR) २०२६ मोहिमेअंतर्गत मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी प्रगणना (Enumeration) फॉर्मचे डिजिटायझेशन विहित मुदतीत १०० टक्के पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले.
कणकवली विधानसभा मतदारसंघातील SIR-२०२६ मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी कणकवली तहसील कार्यालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, प्रांत अधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दिक्षांत देशपांडे, तसेच अधिकारी सूर्यकांत पाटील, शितल जाधव यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेचा मुख्य उद्देश मतदार यादीतील नोंदींची शुद्धता सुनिश्चित करणे हा आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र मतदाराकडून प्रगणना फॉर्म भरून घेऊन त्याची योग्य पद्धतीने नोंद करावी. कोणताही पात्र मतदार मतदार यादीपासून वंचित राहणार नाही, याची सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. तसेच मतदार यादी अधिक अचूक करण्यासाठी मयत मतदारांची नावे विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून कमी करावीत, असेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.
SIR-२०२६ मोहिमेतील प्रत्येक टप्पा वेळेत पूर्ण करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO), पर्यवेक्षक आणि संबंधित अधिकारी यांनी समन्वयाने काम करावे. प्रगणना फॉर्मचे डिजिटायझेशन करताना कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. कामाची नियमित पाहणी करून दैनंदिन प्रगतीचा आढावा घ्यावा, असे निर्देशही त्यांनी दिले.
मतदार यादीतील नावांची पडताळणी, नवीन पात्र मतदारांचा समावेश, स्थलांतरित व मयत मतदारांच्या नोंदींचे अद्ययावतीकरण या सर्व प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात याव्यात. या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करून विहित कालावधीत उद्दिष्ट पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले.
१०० टक्के काम पूर्ण करणाऱ्या BLO यांचा सत्कार
SIR-२०२६ मोहिमेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत प्रगणना फॉर्मचे १०० टक्के डिजिटायझेशन पूर्ण करणारे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) नितीन रावराणे, किशोर चौगुले, सुरेश लोके आणि ऋतुराज कदम यांचा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
