एकही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे
सिंधुदुर्गनगरी : राज्यात सुरू असलेल्या ‘मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) २०२६’ या महत्त्वपूर्ण मोहिमेला भारत निवडणूक आयोगाने ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. कोकणासह राज्यातील अनेक भागांत झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पूरस्थिती, वाहतूक व्यवस्थेतील अडथळे आणि नागरिकांना तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
यापूर्वी ही मोहीम ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत राबविण्यात येत होती. मात्र, नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक ठिकाणी गृहभेटी व सर्वेक्षणाचे काम अपेक्षित गतीने पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे कोणताही पात्र मतदार मतदार यादीतून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने सुधारीत कार्यक्रम जाहीर करत नागरिकांना दिलासा दिला आहे.
वाढीव मुदतीचा लाभ घेऊन आपल्या परिसरात येणाऱ्या बीएलओ (BLO) यांना पूर्ण सहकार्य करावे. गृहभेटीदरम्यान बीएलओकडून उपलब्ध करून दिला जाणारा गणना अर्ज (Enumeration Form) स्वतःची व कुटुंबातील सदस्यांची संपूर्ण आणि अचूक माहिती भरून, आवश्यक स्वाक्षरी करून तात्काळ जमा करावा. लोकशाहीच्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत प्रत्येक पात्र नागरिकाचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.
विशेषतः कोकणातील मुसळधार पावसामुळे अनेक ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यामुळे बीएलओंना गृहभेटी पूर्ण करण्यात तसेच नागरिकांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. आता मिळालेल्या अतिरिक्त मुदतीमुळे प्रशासनाला दुर्गम वाड्या-वस्त्यांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होणार असून नागरिकांनाही अर्ज अचूकपणे भरून देण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.
जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, मतदार यादी ही लोकशाहीचा मूलभूत पाया आहे. प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे बीएलओ घरभेटीसाठी आल्यावर त्यांना सहकार्य करून गणना अर्ज तात्काळ भरून द्यावा. मिळालेल्या मुदतवाढीचा सर्वांनी लाभ घ्यावा.
*सुधारित कार्यक्रम*
बीएलओमार्फत घरोघरी सर्वेक्षण व गृहभेटी : ३० जून ते ८ ऑगस्ट २०२६
मतदान केंद्रांची पुनर्रचना व सुसूत्रीकरण : ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत
मतदार यादीची प्रारूप प्रसिद्धी (Draft Publication) : १७ ऑगस्ट २०२६ (सोमवार)
दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी : १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६
दावे व हरकतींचा निपटारा : १७ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर २०२६
अंतिम मतदार यादी प्रसिद्धी (Final Publication) : १९ ऑक्टोबर २०२६ (सोमवार)
जिल्हा प्रशासनाने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी आणि आपला मतदानाचा घटनादत्त अधिकार अबाधित राखण्यासाठी बीएलओंना सहकार्य करून गणना अर्ज वेळेत भरून द्यावा. एकही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहणार नाही, यासाठी सर्वांनी या विशेष मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा.
