You are currently viewing राष्ट्रीय बुदधिबळपटू बाळकृष्ण पेडणेकर आणि राष्ट्रीय कॅरमपटू साक्षी रामदूरकर यांचा तहसीलदार श्री.श्रीधर पाटील यांच्या हस्ते सत्कार

राष्ट्रीय बुदधिबळपटू बाळकृष्ण पेडणेकर आणि राष्ट्रीय कॅरमपटू साक्षी रामदूरकर यांचा तहसीलदार श्री.श्रीधर पाटील यांच्या हस्ते सत्कार

सावंतवाडी : येथे मुक्ताई ॲकेडमीच्या दहाव्या वर्षातील पदार्पणानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातील अव्वल मानांकित राष्ट्रीय बुदधिबळपटू बाळकृष्ण कौस्तुभ पेडणेकर आणि राष्ट्रीय कॅरमपटू साक्षी रमेश रामदूरकर यांचा सावंतवाडीचे तहसीलदार श्री.श्रीधर पाटील यांच्या हस्ते आणि सुप्रसिदध व्याख्याते प्रा.रुपेश पाटील, बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ प्रबंधक श्री.विनायक नार्वेकर, सुशांत पाटणकर, जनार्दन लक्ष्मण शिर्सेकर शिक्षण संस्थेच्या संचालिका अनुपमा शेटगे, आदि मान्यवर, तसेच मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष श्री.कौस्तुभ पेडणेकर, सरचिटणीस स्नेहा पेडणेकर, विदयार्थी, पालक यांच्या उपस्थितीत विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी श्री.श्रीधर पाटील यांनी, मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ प्रशिक्षक श्री.कौस्तुभ पेडणेकर यांनी कॅरम व बुदधिबळ खेळांमध्ये राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविल्याबददल त्यांचे कौतुक करुन ॲकेडमीला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. अन्य मान्यवरांनी ॲकेडमीच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सर्वप्रथम असोसिएशनच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये पारितोषिक प्राप्त राष्ट्रीय बुदधिबळपटू बाळकृष्ण पेडणेकर याच्या दहा वर्षातील दैदीप्यमान कारकीर्दीचा आढावा घेण्यात आला. माजी जगज्जेता भारतीय बुदधिबळपटू विश्वनाथन आनंद यांच्या २०१९ या वर्षी भारतात पुणे येथे झालेल्या कोचिंग कँपमध्ये दोनशे खेळाडूंमध्ये निवड झालेला बाळकृष्ण हा कोकणातील एकमेव खेळाडू ठरला. शालेय बुदधिबळ स्पर्धेत विभाग स्तरावर सलग चार वेळा आणि राज्य स्तरावर दोन वेळा निवड होणारा बाळकृष्ण जिल्ह्यातील एकमेव खेळाडू आहे. गेल्याच महिन्यात बाळकृष्ण जिल्ह्यातील मुक्ताई ॲकेडमीचा पहिला अधिकृत राज्य पंच म्हणजे आर्बिटर झाला आहे. या वैविध्यपूर्ण कामगिरीबददल तहसीलदार श्री.श्रीधर पाटील यांच्या हस्ते बाळकृष्णचा सत्कार करण्यात आला. मुक्ताई ॲकेडमीची राष्ट्रीय कॅरमपटू साक्षी रामदूरकर हीने सलग चार वर्षे शालेय आणि असोसिएशनच्या जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावरील कॅरम स्पर्धेत अव्वल क्रमांकात स्थान मिळवत राष्ट्रीय स्तरावर निवडुन येण्याची नेत्रदीपक कामगिरी केली आहे. कॅरमप्रमाणे बुदधिबळ स्पर्धेत सलग चार वर्षे विभाग स्तरावर निवड होणारी साक्षी कोकणातील एकमेव खेळाडू आहे. या उल्लेखनीय कामगिरीबददल साक्षीचा तहसीलदार श्री.श्रीधर पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन सौ.स्नेहा पेडणेकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा