वेंगुर्ले लाइटहाऊसजवळ बुडालेल्या सचिन गावडेचा २४ तासांनंतर मृतदेह सापडला
गरीने मासेमारी करताना मोठ्या लाटेने समुद्रात खेचले; आठ दिवसांत वेंगुर्ले तालुक्यातील दुसरी दुर्दैवी घटना
वेंगुर्ले : प्रतिनिधी
वेंगुर्ले निमुसगा भागातील लाइटहाऊसजवळ किनाऱ्यावरील खडकावर बसून गरीने मासेमारी करत असताना समुद्रात बुडालेल्या अणसूर देऊळवाडा येथील सचिन सीताराम गावडे (वय ३०) याचा मृतदेह अखेर २४ तासांनंतर आज सायंकाळी घटनास्थळाजवळील खडकाळ भागात आढळून आला. या घटनेमुळे गावडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
सचिन गावडे हा गुरुवार (१६ जुलै) रोजी सायंकाळी मित्रांसमवेत गरीने मासेमारी करण्यासाठी वेंगुर्ले येथे आला होता. लाइटहाऊसजवळील खडकावर बसून मासेमारी करत असताना अचानक आलेल्या प्रचंड लाटेने त्याला समुद्रात खेचले. काही क्षणांतच तो पाण्यात दिसेनासा झाला. माहिती मिळताच वेंगुर्ले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. मात्र रात्री उशिरापर्यंत त्याचा काहीच मागमूस लागला नव्हता.
आज सकाळपासून पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. अणसूर परिसरातील युवक, ग्रामस्थ आणि स्थानिक बचाव पथकाने शोधकार्य सुरू ठेवले. अखेर सायंकाळी घटनास्थळाजवळील खडकाळ भागात सचिनचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर मृतदेह समुद्रातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी तुळस प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आला. आवश्यक वैद्यकीय व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
सचिन गावडे यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, वहिनी, काका, काकी असा परिवार आहे. वेंगुर्ले तालुक्यात आठ दिवसांच्या कालावधीत समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची ही दुसरी घटना असून, या घटनांमुळे किनारपट्टीवरील धोकादायक ठिकाणी मासेमारी व पर्यटन करताना अधिक सतर्कता बाळगण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
