तळवडेत घनस सापाच्या दंशाने शेतमजूर गंभीर; प्राथमिक उपचारानंतर गोवा बांबुळीला हलविले
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात तातडीने उपचार; किडनीवरील संभाव्य परिणाम लक्षात घेऊन पुढील उपचारासाठी रेफर
सावंतवाडी
सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथे घनस (रसेल्स वायपर) सापाने दंश केल्याने अनंत रामचंद्र कदम (मूळ गाव : दापोली, जि. रत्नागिरी) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात तातडीने प्राथमिक उपचार करण्यात आले असून प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी गोवा येथील बांबुळी रुग्णालयात हलविण्यात आले.
अनंत कदम हे तळवडे येथे कामानिमित्त वास्तव्यास असून गुरुवारी (दि. १६) रात्री साडेनऊच्या सुमारास शेतातील घराजवळ त्यांना घनस सापाने दंश केला. तळवडे ग्रामस्थ व त्यांचे मालक राजाराम गावडे यांनी तत्काळ त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयात डॉक्टर विशाल रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. दिनेश संगेवार व परिचारिका यांनी रक्त तपासणी करून आवश्यक इंजेक्शन व औषधोपचार सुरू केले. रुग्णाच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवत विषाचा प्रभाव तपासण्यासाठी वेळोवेळी रक्त तपासणी करण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी रुग्णालयात भेट देऊन रुग्णाच्या नातेवाईकांची विचारपूस केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजाराम गावडे, संकल्प धारगळकर, दीपक मडगावकर, मिलिंद गावडे, विकास गावडे, अनिकेत गावडे आणि इंद्रजीत गावडे यांनीही रुग्णाची भेट घेऊन धीर दिला.
दरम्यान, दंश करणारा घनस साप ग्रामस्थांनी सुरक्षितरीत्या पकडून नंतर जंगलात सोडून दिला. सर्पविषामुळे किडनीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन नेफ्रॉलॉजिस्टची आवश्यकता असल्याने रुग्णाला पुढील उपचारासाठी गोवा येथील बांबुळी रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती राजू मसूरकर यांनी दिली.
सर्पदंशाच्या रुग्णांवर तातडीने उपचार होणे अत्यंत आवश्यक असून कोब्रा, घनस, मण्यार यांसारख्या विषारी सापांच्या दंशानंतर विलंब न करता जवळच्या रुग्णालयात दाखल व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
