सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सैनिकी कॅन्टीन पूर्ववत सुरू करण्यासाठी माजी सैनिक संघटनाची २१ जून रोजी संयुक्त बैठक
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सैनिकी कॅन्टीन पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व आजी-माजी सैनिक संघटनांनी एकत्र येऊन लढा देण्याचा निर्धार केला आहे. या संदर्भात, सर्व आजी-माजी सैनिक संघटनांची संयुक्त बैठक शुक्रवार, २१ जून रोजी सकाळी ११ वाजता सावंतवाडी, कोलगाव येथील सैनिक पतसंस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.
माजी खासदार तथा ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी स्पष्ट केले की, ही बैठक सैनिकी कॅन्टीन सुरू होण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. त्यांनी सावंतवाडी, खासकीलवाडा येथे सिंधुदुर्ग जिल्हा सेवा सैनिक संघाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आयोजित बैठकीत बोलताना सांगितले की, “एकीचे बळ निर्माण करून सरकारला जागे करूया.”
या बैठकीत जिल्हा तसेच तालुका आणि गावनिहाय सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. सर्व संघटनांच्या माध्यमातून राज्यात सैनिक फेडरेशनची निर्मिती करण्यात आली असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सैनिक कॅन्टीन लवकरच सुरू होण्यासाठी हे पहिले पाऊल असल्याचे ब्रिगेडियर सावंत यांनी नमूद केले.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा सेवानिवृत्त सैनिक संघाचे जिल्हाध्यक्ष विष्णू ताम्हणकर, सचिव संजय सावंत, सैनिक पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर आणि सैनिक फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष केटी परब आदी उपस्थित होते. सैनिकी कॅन्टीन सुरू झाल्यास जिल्ह्यातील आजी-माजी सैनिकांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांच्या अनेक वर्षांच्या मागणीला आता एकत्रित प्रयत्नांमुळे यश येण्याची आशा निर्माण झाली आहे.