सवंगडी ग्रुपचा आंबोलीतील तीन दिवसीय गेट-टुगेदर उत्साहात संपन्न
साठीनंतरही मैत्रीचा अनोखा उत्सव; आठवणी, निसर्गभ्रमंती, गाणी-भेंड्या आणि बबन भोगले यांच्या जिद्दीला सलाम
आंबोली | प्रतिनिधी :
सवंगडी ग्रुपच्या ६० वर्षांवरील मित्रमंडळींचे आंबोली येथे आयोजित तीन दिवसीय गेट-टुगेदर आनंदी आणि भावनिक वातावरणात संपन्न झाले. तब्बल २० मित्रांनी एकत्र राहत शालेय जीवनातील आठवणी, नोकरी आणि व्यवसायातील अनुभव एकमेकांशी शेअर करत मैत्रीचे बंध अधिक दृढ केले.
या सहलीदरम्यान हिरण्यकेशी मंदिर, महादेव मंदिर, बाबा धबधबा, केसरी परिसर, अॅक्वेरियम, गुहेतून पडणारा धबधबा तसेच आंबोलीतील निसर्गरम्य स्थळांना भेट देण्यात आली. झोंबणारा वारा, मुसळधार पाऊस आणि धबधब्यांच्या सान्निध्यात सर्वांनी मनमुराद आनंद लुटला. विशेष म्हणजे बेंगळुरूहून खास या गेट-टुगेदरसाठी उपस्थित राहिलेल्या अनिल सामंत यांचे सर्वांनी विशेष कौतुक केले.
रात्री कराओकेवर जुन्या-नव्या मराठी गीतांचा कार्यक्रम, मुलं विरुद्ध मुली अशा रंगलेल्या भेंड्या आणि गप्पांच्या मैफलीमुळे गुरुवारी पहाटे दोन वाजेपर्यंत उत्साह कायम होता. शेवटच्या दिवशी केसरी संग्रहालय आणि माणगाव येथील दत्तमंदिराचे दर्शन घेऊन सर्वजण आपल्या गावी रवाना झाले.
या गेट-टुगेदरचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रकृती अस्वस्थ असूनही वॉकरच्या सहाय्याने बबन भोगले यांनी रिसॉर्टवर येत सर्व मित्रांची भेट घेतली, त्यांच्यासोबत रात्रीचे जेवण केले आणि मुलगा सागर भोगले यांच्यासह रात्रीच फोंडाघाटला परतले. त्यांच्या या जिद्दीचे आणि मैत्रीप्रती असलेल्या प्रेमाचे सर्वांनी मनापासून कौतुक केले.
रिसॉर्ट सोडताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. “या वयातही आपण सर्वजण एकत्र येतो, हीच खरी आयुष्याची कमाई आहे. पुढील गेट-टुगेदरपर्यंत हीच ऊर्जा कायम राहील,” अशी भावना अजित नाडकर्णी यांनी व्यक्त केली.
दरम्यान, पुढील वर्षी फोंडाघाट, दाजीपूर, मालवण आणि देवगड परिसरात पुन्हा अशाच स्वरूपाचे गेट-टुगेदर आयोजित करण्याचा निर्धार सर्व सवनगडींनी व्यक्त केला.
