विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळण्यास होणार मदत
वेंगुर्ला / परुळे : माजी सभापती शिक्षण व आरोग्य निलेश सामंत यांनी माजी विद्यार्थी मेळाव्यात दिलेला शब्द पूर्ण करत जिल्हा परिषद शाळा परुळे नं. ३ येथे संगणक कक्षासाठी ६० हजार रुपयांची देणगी दिली. या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळावे, आधुनिक तंत्रज्ञानाशी त्यांची ओळख व्हावी तसेच शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, या उद्देशाने शाळेत संगणक कक्ष उभारण्यात येत आहे. या उपक्रमासाठी माजी सभापती निलेश सामंत यांनी आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे.
संगणक कक्षामुळे विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रात्यक्षिक ज्ञान मिळण्यास मदत होणार असून, डिजिटल शिक्षणाला चालना मिळणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रवाहात आणण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
यावेळी शाळेतील शिक्षक, विद्यार्थी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. माजी सभापती निलेश सामंत यांच्या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समाजातील विविध घटकांनी शाळेला अशा प्रकारे सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी सरपंच प्रणिती आंबडपालकर, माजी विद्यार्थी अध्यक्ष पुरुषोत्तम प्रभू, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष दर्शना नानचे, मुख्याध्यापक रविन्द्र गोसावी, उपाध्यक्ष अमोल मेस्त्री, मुग्धा परुळेकर, शिक्षक शालीक पाटील यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
