You are currently viewing मुक्ताई ॲकेडमीची दशकपूर्तीकडे दिमाखदार वाटचाल; नव्या जर्सीचे शानदार अनावरण

मुक्ताई ॲकेडमीची दशकपूर्तीकडे दिमाखदार वाटचाल; नव्या जर्सीचे शानदार अनावरण

मुक्ताई ॲकेडमीची दशकपूर्तीकडे दिमाखदार वाटचाल; नव्या जर्सीचे शानदार अनावरण

क्रीडा क्षेत्रासोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांचा दशकभराचा प्रवास

सावंतवाडी

विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा कौशल्य, आत्मविश्वास आणि जिद्द निर्माण करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या मुक्ताई ॲकेडमीने यशस्वी वाटचालीचे दहावे वर्ष उत्साहात सुरू केले. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ॲकेडमीच्या नव्या जर्सीचे मान्यवरांच्या हस्ते दिमाखदार अनावरण करण्यात आले. यावेळी खेळाडूंमध्ये नव्या जर्सीचा उत्साह आणि अभिमान स्पष्टपणे दिसून आला.
कार्यक्रमाला सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील, सुप्रसिद्ध प्रेरणादायी व्याख्याते प्रा. रुपेश पाटील, बँक ऑफ इंडिया सावंतवाडी शाखेचे वरिष्ठ प्रबंधक विनायक नार्वेकर, जनार्दन लक्ष्मण शिर्सेकर शिक्षण संस्था मुंबईच्या संचालिका अनुपमा शेटगे, पाटणकरवाड्याचे सुशांत पाटणकर, पत्रकार साबाजी परब यांच्यासह मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर, सरचिटणीस स्नेहा पेडणेकर आणि कोषाध्यक्ष बाळकृष्ण पेडणेकर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कौस्तुभ पेडणेकर यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते नव्या जर्सीचे अनावरण करण्यात आले.
खेळातून जिद्द, शिस्त आणि विजयाची मानसिकता घडते : श्रीधर पाटील
विद्यार्थ्यांच्या यशामध्ये केवळ अभ्यासाचे योगदान नसून शालेय उपक्रम आणि खेळातील सहभागही तितकाच महत्त्वाचा असल्याचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी सांगितले. खेळामुळे विविध स्पर्धा, खेळाडू आणि क्रीडा क्षेत्राची जाण निर्माण होते. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत किमान एका खेळात प्रावीण्य मिळवावे. खेळातून जिद्द, शिस्त, आत्मविश्वास आणि विजयाची मानसिकता विकसित होते, असे त्यांनी नमूद केले. मुक्ताई ॲकेडमीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.
क्रीडा संस्कृती रुजविण्याचे कौस्तुभ पेडणेकर यांचे योगदान
प्रा. रुपेश पाटील यांनी मुक्ताई ॲकेडमीचा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास जवळून पाहिल्याचे सांगितले. सावंतवाडीमध्ये बुद्धिबळ आणि कॅरमसारख्या बुद्धीला चालना देणाऱ्या खेळांना लोकप्रिय करण्याचे काम कौस्तुभ पेडणेकर यांच्या माध्यमातून प्रभावीपणे होत असल्याचे त्यांनी सांगितले. ॲकेडमीच्या पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.
विनायक नार्वेकर यांनीही मुक्ताई ॲकेडमीच्या कार्याचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना क्रीडा प्रशिक्षणासोबतच संस्कारक्षम वातावरण मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
दहा वर्षांत विविध उपक्रमांची भक्कम पायाभरणी
प्रास्ताविकात कौस्तुभ पेडणेकर यांनी गेल्या दहा वर्षांत मुक्ताई ॲकेडमीने विद्यार्थ्यांसाठी कॅरम, बुद्धिबळ, टेबल टेनिस यांसह ॲक्टिंग, म्युझिक आणि डान्स अशा विविध क्षेत्रांमध्ये सेमिनार, प्रशिक्षण शिबिरे आणि स्पर्धांचे आयोजन केल्याची माहिती दिली.
मुक्ताई ॲकेडमीच्या दशकपूर्तीच्या या सोहळ्यात नव्या जर्सीचे अनावरण हा केवळ एक औपचारिक कार्यक्रम न ठरता, सावंतवाडीच्या क्रीडा क्षेत्रातील नव्या पिढीच्या स्वप्नांना आणि कर्तृत्वाला नवी दिशा देण्याचा संकल्प ठरला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कौस्तुभ पेडणेकर यांनी केले, तर स्नेहा पेडणेकर यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा