मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात माजी विद्यार्थी मार्गदर्शन सोहळा संपन्न..
चिपळूण ,मांडकी-पालवण
कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी-पालवण संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात ‘माजी विद्यार्थी मार्गदर्शन व संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले, तसेच ४ विद्यार्थ्यांची थेट प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाला ओलाम ऍग्री चे संचालक श्री. विक्रम शिंदे, रॅबिट इंडियाचे संचालक श्री. केदार भोसले आणि भारती ग्रीन टेकचे संस्थापक श्री. विनय पोळ हे माजी विद्यार्थी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना माजी विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयीन व व्यावसायिक आयुष्यातील विविध अनुभव उपस्थितांसमोर मांडले. विद्यार्थ्यांनी कठोर मेहनत घेऊन आपली स्वप्ने साकार करावीत, असे आवाहन त्यांनी केले. उपलब्ध असलेल्या संसाधनांचे योग्य नियोजन आणि वापर करून विद्यार्थ्यांनी आपला व्यक्तिमत्त्व विकास, तसेच सामाजिक व आर्थिक विकास साधावा, असे त्यांनी सांगितले. “कृषीचे विद्यार्थी जगाच्या पाठीवर कुठेही गेले, तरी त्यांचे नाव आणि नाते नेहमी मातीशी जोडलेले असावे,” अशी भावना या वेळी माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे विशेष औचित्य साधत, ‘भारती ग्रीन टेक’चे संस्थापक श्री. विनय पोळ यांनी महाविद्यालयातील चार होतकरू विद्यार्थ्यांची ‘कृषी उद्योग संलग्नक प्रशिक्षणासाठी’ निवड केली. यामध्ये कु. अथर्व पाचोरे, कु. सिद्धेश्वर गळवे, कु. ओम देवकर, कु. अथर्व भुजबळ या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचे व्यावहारिक प्रशिक्षण देऊन, भविष्यात त्यांना रोजगाराच्या व व्यवसायाच्या चांगल्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाही श्री. पोळ यांनी या वेळी दिली.
या कार्यक्रमाला कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) डॉ. निखिल चोरगे, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शमिका चोरगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी या मार्गदर्शन कार्यक्रमाला उपस्थित होते.
