क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात १४ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ‘जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताह २०२६’ साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाच्या अनुषंगाने ग्रामपंचायत वडाचापाट येथील कातकरी वस्तीत ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ मोहीम उत्साहात राबविण्यात आली. या मोहिमेद्वारे आदिवासी बांधवांमध्ये आरोग्य, स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीबाबत जनजागृती करण्यात आली.
या उपक्रमांतर्गत कातकरी वस्तीमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच नागरिकांची रक्तदाब (बीपी) व रक्तशर्करा (शुगर) तपासणी करण्यात आली. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने सॅनिटरी पॅडचे वाटप करून त्याचा योग्य वापर, मासिक पाळीतील स्वच्छता आणि आरोग्यविषयक काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या मोहिमेला पंचायत समितीच्या सभापती प्रज्ञा चव्हाण, जिल्हा परिषद सुकळवाड मतदारसंघाच्या सदस्या सुमेधा पाताडे, पंचायत समिती मालवणचे सहाय्यक गटविकास अधिकारी पांडुरंग सावंत, महसूल विभागाचे विनायक जांभेकर, नायब तहसीलदार संतोष गुरखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी ग्रामपंचायत वडाचापाटच्या सरपंच सोनिया प्रभुदेसाई, उपसरपंच सचिन पाताडे, सदस्या माळकर, माजी सभापती राजेंद्र प्रभू देसाई, ग्रामपंचायत अधिकारी लक्ष्मण धोंडी सरमळकर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण (रायगड) येथील अधिकारी रोशन डिसोझा, आरोग्य विभागाच्या सीएचओ भक्ती परब, आरोग्य सेवक कसालकर, दयानंद प्रभू देसाई, मनीष सावंत, अमित प्रभू देसाई, विनायक आंगणे, चंद्रकांत वाघमारे, रत्नाकर पालव, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, आशा सेविका व अंगणवाडी मदतनीस उपस्थित होते.
ग्रामीण व आदिवासी वस्तीतील नागरिकांना आरोग्याच्या समस्यांबाबत वेळीच जागरूक करणे, आजारांचे प्राथमिक टप्प्यावर निदान होण्यासाठी नियमित तपासणीचे महत्त्व पटवून देणे आणि स्वच्छतेच्या सवयी रुजविणे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांचे आरोग्य, स्वच्छता आणि सर्वांगीण विकास यांना प्राधान्य देत ग्रामपंचायत वडाचापाटने घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद ठरला.