You are currently viewing प.बंगालमधील पांडवेश्वर चे मैदान मारण्याची जबाबदारी अतुल काळसेकर यांच्या खांद्यावर

प.बंगालमधील पांडवेश्वर चे मैदान मारण्याची जबाबदारी अतुल काळसेकर यांच्या खांद्यावर

कणकवली पॅटर्न ” ने पांडवेश्वर जिंकण्याचा काळसेकर यांचा निर्धार

सिंधुदुर्ग

कणकवली विधानसभा निडणुकीप्रमाणेच प.बंगालच्या पांडवेश्वर मतदारसंघात भाजपाचे कमळ फुलविण्याची जबाबदारी सिंधुदुर्ग च्या सुपुत्रावर अर्थात अतुल काळसेकर यांच्यावर केंद्रीय भाजपा श्रेष्ठींनी टाकली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक असलेले भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर हे 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील कणकवली पॅटर्नप्रमाणेच प.बंगालच्या 275 क्रमांकाच्या पांडवेश्वर विधानसभा मतदारसंघात भाजपा चे कमळ फुलविण्यास सज्ज झाले आहेत.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपात आलेल्या नितेश राणेंच्या विजयासाठी अतुल काळसेकर यांनी घेतलेली मेहनत आणि मूळ भाजपासह आरएसएस, बजरंग दल, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विंहीप आणि राणेंची ताकद याचा काळसेकर यांनी सुरेख संगम साधून नितेश राणेंच्या विजयात वापरलेले संघटनकौशल्य भाजपाश्रेष्ठीनी अचूक हेरले आणि थेट प.बंगालच्या वर्दमान प.जिल्ह्यातील पांडवेश्वर या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी काळसेकर यांच्या खांद्यावर सोपवली आहे.

1 लाख 96 हजार मतदार असलेल्या पांडवेश्वर मतदारसंघातील लोकसभा खासदार म्हणून सध्या विद्यमान केंद्रीय मंत्री असलेले आणि सुप्रसिद्ध बंगाली गायक बाबूल सुप्रीयो नेतृत्व करत आहेत. येत्या 26 एप्रिलला पांडवेश्वर मतदारसंघात मतदान होणार आहे. 2014 पासून सलग 2 वेळ बाबूल हे खासदार आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत खासदार बाबूल यांनी विरोधी उमेदवार बॉलिवूड अभिनेत्री मूनमून सेन चा पराभव केला होता. तर पांडवेश्वर मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसचे असलेले विद्यमान आमदार, ज्यांनी भाजपात प्रवेश केलाय ते जितेंद्र तिवारी हेच भाजपा उमेदवार म्हणून ममता दिदींच्या उमेदवाराला आता टक्कर देणार आहेत. भाजपा प.बंगाल ची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प.बंगालवासीयांना विकासाचा शब्द दिला आहे. केंद्राचा निधी, उज्वला गॅस, जनधन योजना सारख्या सर्वसामान्य जनतेला थेट लाभ मिळवून देणाऱ्या योजना प.बंगालवासीयांच्या आर्थिक उन्नतीसाठी अधिक सक्षमपणे राबवायच्या आहेत. जी स्थिती कणकवली विधानसभा मतदारसंघात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत होती, तीच अवस्था सध्या पांडवेश्वर मतदारसंघात आहे. 2019 मध्ये नितेश राणेंच्या भाजपामधून उमेदवारीला विरोध करणाऱ्या शिवसेनेला अतुल काळसेकर यांनी तर घर आमचे…चूल आमची..मग आमच्या चुलीवर काय शिजवायचे हे आम्ही ठरवणार, ते सांगणारे तुम्ही कोण असा रोखठोक सवाल केला होता. नितेश राणेंच्या विजयाच्या प्लॅनिंगमध्ये थिंक टॅंक म्हणून अतुल काळसेकर यांची महत्वाची भूमिका होती.पांडवेश्वर मतदारसंघातही जितेंद्र तिवारी यांची स्वतःची राजकीय ताकद आणि तेथील भाजपाची ताकद याची जोडणी करून भाजपाच्या अन्य सहकारी संघटनांच्या माध्यमातून पांडवेश्वर जिंकायचेच आणि प.बंगालमध्ये कणकवली पॅटर्न यशस्वी करायचा यासाठी मायक्रो प्लॅनिंग काळसेकर यांनी केले आहे. 2016 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पांडवेश्वर मतदारसंघात भाजपाला तिसऱ्या क्रमांकाची केवळ 13 हजार मते मिळाली होती. मात्र आता तेथील स्थानिक राजकीय समीकरणे बदलली असून तृणमूल काँग्रेस मधून निवडून आलेले खुद्द विद्यमान आमदारच जितेंद्र तिवारी हे सध्या भाजपचे उमेदवार आहेत. होळीच्या दुसऱ्या दिवशी अतुल काळसेकर हे मिशन प.बंगाल साठी रवाना होणार असून भाजपाच्या प.बंगाल प्रदेशाध्यक्षांशी सल्लामसलत केल्यानंतर लागलीच काळसेकर पांडवेश्वर च्या रणभूमीवर उतरणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा