You are currently viewing रूपेश पावसकर यांच्या पाठपुराव्याला यश; दोन वर्षांपासून बंद असलेले नेरूर उपकेंद्र लवकरच सुरू होणार

रूपेश पावसकर यांच्या पाठपुराव्याला यश; दोन वर्षांपासून बंद असलेले नेरूर उपकेंद्र लवकरच सुरू होणार

आरोग्य समितीत प्रश्न लावून धरत सीईओ व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे केला पाठपुरावा

कुडाळ / नेरूर : नेरूर देऊळवाडा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत बांधून पूर्ण होऊन दोन वर्षे झाली तरीही ती सेवाअभावी बंद होती. या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करत जिल्हा परिषद सदस्य रूपेश पावसकर यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून नेरूर उपकेंद्र लवकरच सुरू होणार आहे.

उपकेंद्राची इमारत तयार असूनही ती कार्यान्वित न झाल्याने परिसरातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवेसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. हा प्रश्न गांभीर्याने घेत रूपेश पावसकर यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन उपकेंद्र सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा केली.

पावसकर यांच्या पाठपुराव्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी नेरूर उपकेंद्राला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. इमारत पूर्णपणे सुसज्ज असल्याचे आढळून आल्यानंतर उपकेंद्र तातडीने सुरू करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आले.

याचबरोबर उपकेंद्रापर्यंत जाणारा रस्ता २३ नंबरला नोंद करून घेण्याचे आदेश ग्रामसेवक व सरपंच यांना देण्यात आले आहेत.

उपकेंद्र सुरू झाल्यानंतर नेरूरसह पंचक्रोशीतील नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवा गावातच उपलब्ध होणार असून, त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल ग्रामस्थांनी जिल्हा परिषद सदस्य रूपेश पावसकर यांचे आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा