You are currently viewing बालकांच्या मदतीसाठी चाईल्ड हेल्पलाइन १०९८; सायबर फसवणूक झाल्यास १९३० वर संपर्क साधा

बालकांच्या मदतीसाठी चाईल्ड हेल्पलाइन १०९८; सायबर फसवणूक झाल्यास १९३० वर संपर्क साधा

अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांचे आवाहन

सिंधुदुर्ग :

संकटात सापडलेल्या बालकांना मदतीचा हात देण्यासाठी चाईल्ड हेल्पलाइन १०९८ ही सेवा २४ तास कार्यरत आहे. तसेच ऑनलाइन आर्थिक फसवणूक किंवा अन्य सायबर गुन्ह्यांना बळी पडल्यास राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन १९३० वर त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी केले आहे.

शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त महिला व बालविकास विभागाच्या योजना आणि जनजागृती उपक्रमांची माहिती देताना त्यांनी बालकांचे संरक्षण आणि सायबर सुरक्षिततेचे महत्त्व स्पष्ट केले.

संकटग्रस्त बालकांसाठी १०९८

चाइल्ड हेल्पलाइन १०९८ ही ० ते १८ वर्षे वयोगटातील संकटग्रस्त बालकांसाठी २४ तास उपलब्ध असलेली मदतसेवा आहे. महिला व बालविकास विभागामार्फत ही सेवा राबविण्यात येते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या सेवेचे कामकाज शासकीय मुलांचे निरीक्षण गृह व बालगृह, ओरोस येथील यंत्रणेमार्फत केले जाते.

कुटुंबात घरगुती हिंसा, शारीरिक किंवा मानसिक त्रास सहन करणाऱ्या बालकांना, घरातून किंवा शाळेतून निघून आलेल्या बालकांना, तसेच बालकांचे शोषण किंवा गैरवापर होत असल्यास मदतीसाठी १०९८ वर संपर्क साधता येतो. याशिवाय अन्न, शिक्षण, आरोग्यसेवा, निवारा, संरक्षण किंवा वैद्यकीय मदतीची गरज असलेल्या बालकांसाठीही ही सेवा उपयुक्त आहे. बालक संकटात असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी तत्काळ हेल्पलाइनवर संपर्क साधावा.

सायबर सुरक्षिततेसाठी सावधगिरी आवश्यक

मोबाईल आणि इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे ऑनलाइन आर्थिक फसवणूक, बनावट सोशल मीडिया प्रोफाइल, ऑनलाइन धमकी व छळ तसेच वैयक्तिक माहितीचा गैरवापर अशा सायबर गुन्ह्यांचा धोका निर्माण होतो. हे टाळण्यासाठी नागरिकांनी आपला ओटीपी, पिन आणि पासवर्ड कोणालाही सांगू नये. अनोळखी लिंक किंवा संशयास्पद संदेशांवर क्लिक करू नये. तसेच आपली छायाचित्रे आणि वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर शेअर करताना काळजी घ्यावी.

ऑनलाइन फसवणूक झाल्यास घाबरून न जाता त्वरित राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन १९३० वर संपर्क साधावा. तसेच राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार पोर्टल येथे ऑनलाइन तक्रार नोंदविता येते.

बालकांच्या संरक्षणासाठी सजग राहणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. ‘सजग नागरिक, सुरक्षित बालक आणि सुरक्षित समाज’ या संदेशातून नागरिकांनी जागरूकतेची शक्ती आपल्या आचरणात आणावी, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा