सिंधुदुर्ग : भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ आणि ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी डॉ. कलाम यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी (सा. प्र.) प्रतिभा वराळे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) बालाजी शेवाळी, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे म्हणाल्या की, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस हा महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ. ए. पी. जे. अब्दूल कलाम यांनी आपल्या ज्ञानाच्या, संशोधनाच्या आणि कर्तृत्वाच्या बळावर देशाच्या विकासात मोलाचे योगदान दिले. अत्यंत साध्या परिस्थितीतून पुढे येत त्यांनी आपल्या जिद्द, मेहनत आणि दूरदृष्टीच्या जोरावर देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदापर्यंत मजल मारली. त्यांचे जीवन हे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी, युवकासाठी आणि समाजातील प्रत्येक घटकासाठी प्रेरणादायी आहे.
डॉ. कलाम यांच्या जीवनकार्यापासून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड जोपासावी, ज्ञानाची कक्षा रुंदावावी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांतून आपले ध्येय साध्य करावे, असे आवाहनही श्रीमती साठे यांनी यावेळी केले.
