You are currently viewing रेवंडी-कोळंब रस्ताप्रकरणी आमदार नाईकांकडून जनतेची फसवणूक – विजय केनवडेकर

रेवंडी-कोळंब रस्ताप्रकरणी आमदार नाईकांकडून जनतेची फसवणूक – विजय केनवडेकर

मालवण

रेवंडी भद्रकाली मंदिर ते कोळंब रस्ता डांबरीकरण व मजबुतीकरणासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या खास शिफारशीनुसार व भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे २०२३ च्या जिल्हा नियोजन निधीमधून मंजूर करून घेण्यात आला होता. या कामाला अद्याप कार्यारंभ आदेश मिळाला नसतानाही या रस्त्याचे फुकाचे श्रेय घेण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी भूमिपूजन करून रेवंडी गावच्या रहिवाशांची फसवणूक केली आहे असा आरोप भाजपचे शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी पत्रकातून केला आहे.
संबंधित रस्त्याच्या कामाला जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून अजूनही तांत्रिक मंजुरी घेतलेली नाही असे असताना रस्त्याचा कोणता दर्जा राहणार? कशाप्रकारे राहणार? यासंबंधी कोणतीही माहिती न घेता श्रेयासाठी हे भूमिपूजन आमदार नाईक यांनी केले आहे. यासंबंधी तांत्रिक मंजुरी २३ मे २०२३ रोजी जिल्हा परिषद विशेष सभेमध्ये रस्त्याचे डांबरीकरण हा विषय आहे. मंजुरी नंतर निविदा निघणार आहे. त्यानंतर या कामाचा कार्यारंभ आदेश काढण्यात येणार आहे. शासकिय प्रक्रिया पूर्ण न होता ठेकेदारांना हाताशी धरून व जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना दमदाटी करून कामाचा शुभारंभ करून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न आमदार करत आहेत.

याबाबतची पूर्ण माहिती भाजपाकडे असून या कामासंदर्भात रस्त्याची ज्या प्रकारे तांत्रीक मंजुरी कशा प्रकारे देणार आहेत व पाण्याच्या निचरासाठी गटाराची व्यवस्था करणार की नाही यासंबंधीचा तांत्रिक मंजुरी नसल्यास या कामाची लेखी स्वरूपात भारतीय जनता पार्टी पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच जिल्हा परिषद मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे संबंधित अधिकारी खोटी माहिती देऊन जनतेची फसवणूक करत आहेत याची लेखी तक्रार देणार आहे. या रस्त्यावर अनधिकृत पणे टाकलेली खडी ही शासनाने जमा करून घ्यावी अशा प्रकारची लेखी तक्रारही करण्यात येणार आहे.
रेवंडीचा रस्ता ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी मार्फत करून देण्याचे अभिवचन रेवंडीवासियांना दिले होते. त्यानुसारच हा निधी निलेश राणे यांच्यामार्फत मंजूर करून घेण्यात आला आहे. या रस्त्याच्या मंजुरीचे पालकमंत्री यांनी शेरा मारलेले पत्र आमच्याकडे उपलब्ध आहे. त्याचबरोबर केलेल्या कामाचा पाठपुरावा याची पण पत्रे आमच्याकडे आहेत. असे असताना तीन वर्षे सत्तेत असताना पण रस्त्याचे खड्डे बुजवू न शकलेले आमदार फुकाचे श्रेय घेण्यासाठी भूमिपूजन करतात हि जनतेची फसवणूक आहे.

पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आंगणेवाडी येथील रस्ते ज्याप्रमाणे दर्जेदार करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे दर्जेदार रस्ता रेवंडीवासियांना मिळवून देण्याचा पूर्ण प्रयत्न भाजपा करत आहे. श्री भद्रकाली मंदिरात बरेच भाविक जात असतात. त्यांचा प्रवास सुखर व्हावा म्हणून पालकमंत्री यांनी विशेष मंजुरी रस्त्याला दिली आहे. त्याचबरोबर रेवंडी येथील कांबळी यांचा घरानजिकचा रस्ता, गणेश घाट अशी तीन विकासकामांना भाजपाने विशेष मंजुरी घेतली आहे. तसेच शेलटी रेवंडी भद्रकाली मंदिर मार्गे कोळंब हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये घेण्यासाठी निलेश राणे विशेष प्रयत्न करत आहेत. यासंबंधी त्या खात्याकडे पाठपुरावा पालकमंत्र्यांमार्फत सुरू आहे असेही श्री. केनवडेकर यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + 14 =