कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या ४९ व्या ‘गावंढळ’ कादंबरीचा प्रकाशन सोहळा संपन्न.
चिपळूण, मांडकी-पालवण
कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेचे संस्थापक तथा रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या ४९ व्या ‘गावंढळ’ या नवीन कादंबरीचा प्रकाशन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. मराठी साहित्य व सांस्कृतिक महामंडळाचे उपाध्यक्ष तथा कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रा. प्रदीप ढवळ यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
कृषी क्षेत्रातील गौरवशाली व यशस्वी कार्यासोबतच लेखणीवरील प्रेम आणि आवडीमुळे त्यांनी सातत्याने वेगळ्या विषयांवर लेखन करत साहित्यसृष्टीत आपला नवा वलय निर्माण केला आहे, अशी भावना यावेळी उपस्थित कादंबरीचे उद्घाटक डॉ. प्रदीप ढवळ यांनी केली. त्यांच्या मनोगतात कृषीभूषण डॉ.तानाजीराव चोरगे यांच्या लेखणी चे वैशिष्ट्य म्हणजे समाजभान , सामाजिक बांधिलकी, सामाजिक वास्तव, ज्वलंत प्रश्नांचे सखोल अभ्यास व त्यातून कादंबरी मध्ये त्याची मांडणी याची सांगड ही ‘गावंढळ’ या पुस्तकात दिसून येते असेही त्यांनी म्हटलं, माणसाचं कर्तुत्व हे सर्वात महत्त्वाचं असतं ते कार्यातून व लेखनातून समजतात. गावंढळ या शब्दात प्रेम व आस आहे. ही कादंबरी गुंफून अस्वस्थ करून टाकणारी आहे, त्यामुळे या कादंबरीचा वेगळा आयाम निर्माण होत आहे. त्यातली व्यक्तिमत्व ही खूप खोलवर दाखवलेले आहे तसेच अलंकारिक भाषेसहजी शब्दरचना आहे आणि कादंबरीची मांडणी आहे ती देखील अगदी लेखकाच्या लेखणीला साजेशी आहे.
याचबरोबर केशवसुत स्मारक मालगुंड चे अध्यक्ष श्री. गजानन पाटील यांनी कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या कार्याचे खूप वेगवेगळी अंगे आहेत. असे बहुआयामी नेतृत्व म्हणजे कृषी, शिक्षण, सहकार , साहित्य क्षेत्र ,क्रीडा क्षेत्र व नाटक सर्वत्र दिसते तसेच ‘गावंढळ’ हे पुस्तक हे समाजाच्या सत्य परिस्थितीवर आधारित आहे अशी भावना देखील त्यांनी बोलताना व्यक्त केली.
ज्येष्ठ साहित्यिक श्री. प्रकाश देशपांडे यांनी देखील त्यांच्या मनोगतात समाजातील जळजळीत प्रतिबिंब या ‘गावंढळ’ कादंबरीत दिसते . आज काळ बदलत आहे, समाजही बदलत आहे परंतु जे काही संस्कार आहेत ते खूप महत्त्वाचे आहे आणि त्यांची जोपासना झाली पाहिजे, पाश्चात्य संस्कृतीच्या अनुकरण करताना आपल्या संस्कृतीला विसरू नका ? कुटुंब व्यवस्थेबाबतची वास्तवता या कादंबरीत मांडलेली आहे ती खरंच मनाला चटका लावणारी आहे ! असे देखील त्यांनी बोलताना व्यक्त केले.
‘गावंढळ’ कादंबरीचे लेखक कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांनी देखील आपल्या मनोगतात सांगितले की ते अनुभवातून लेखन करत गेले, समाजस्पर्श लेखन भरपूर आहे. शिक्षण व शेती हे समाजसुधारणेतील महत्त्वाच्या गोष्टी आणि त्यांच्याकडे पहात त्या दृष्टिकोनातूनच ते लेखन करत आलेले आहे. समाजसत्य विचारावर लेखन ही त्यांची कला आहे आणि खरा हाडाचा लेखक कधीही वेळेबाबत कुरकुर करत नाही वेळेचे कारण देऊन कधीही लेखन टाळतही नाही.
या प्रकाशन सोहळ्याला ‘गावंढळ’ कादंबरीचे लेखक कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे (कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेचे संस्थापक ), डॉ. प्रा. प्रदीप ढवळ (उपाध्यक्ष, मराठी साहित्य व सांस्कृतिक महामंडळ तथा कार्याध्यक्ष, कोमसाप), मा. प्रकाश देशपांडे (ज्येष्ठ साहित्यिक) मा. गजानन पाटील (अध्यक्ष, केशवसुत स्मारक, मालगुंड), डॉ. निखिल चोरगे (उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी भूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था ) , प्रा. सौ. अंजलीताई चोरगे (संचालिका, कृषी भूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था), डॉ. संकेत कदम (प्राचार्य, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय),डॉ. शमिका चोरगे (प्राचार्य, जिजामाता महिला कृषी महाविद्यालय), प्रा.सचिन तांबेकर (प्राचार्य, गोविंदरावजी निकम कनिष्ठ महाविद्यालय) यांसह संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापकवृंद, विद्यार्थी व साहित्यिकप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
