देवगड-जामसंडेत मोकाट जनावरांवर अखेर ठोस निर्णय; तात्पुरता कोंडवाडा उभारणार
नेनेनगर येथे तात्पुरते कोंडवाडा स्थानक, गुरे पकडण्यासाठी स्वतंत्र पथक व शहर सुरक्षा दल स्थापन करण्याचा विशेष सभेत निर्णय
देवगड :
देवगड-जामसंडे शहरातील मोकाट जनावरांच्या वाढत्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी सोमवारी आयोजित विशेष सर्वसाधारण सभेत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मोकाट गुरे पकडण्यासाठी स्वतंत्र पथक नेमण्यासह पकडलेल्या जनावरांसाठी नगरपंचायतीच्या मालकीच्या नेनेनगर येथील जागेत तात्पुरत्या स्वरूपात कोंडवाडा उभारण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला.
नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला उपनगराध्यक्षा मिताली सावंत, मुख्याधिकारी गौरी पाटील, पोलीस निरीक्षक श्याम बुवा, स्वच्छता सभापती बुवा तारी, पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोस्कर तसेच नगरसेवक उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीला नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी मोकाट जनावरांमुळे भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे सांगितले. नगरसेवक चंद्रकांत कावले यांनी या विषयावर गेल्या साडेचार वर्षांत विशेष बैठक का घेण्यात आली नाही, असा सवाल उपस्थित केला. यावर गटनेते शरद ठुकरूल यांनी राजकारण न करता समस्येवर सामूहिक तोडगा काढण्याचे आवाहन केले.
नगरसेवक सुधीर तांबे यांनी यापूर्वी गुरे पकडण्यासाठी एजन्सी नेमण्याचा ठराव झाला होता, त्याची अंमलबजावणी का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित करत मोकाट गुरांमुळे झालेल्या अपघातात एका युवकाचा बळी गेल्याची आठवण करून दिली.
पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोस्कर यांनी नेनेनगर येथील नगरपंचायतीच्या कंपाऊंड वॉल असलेल्या जागेत तात्पुरता कोंडवाडा सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यास नगराध्यक्षा, मुख्याधिकारी आणि स्वच्छता सभापती यांनी मान्यता देत तातडीने कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश दिले.
पोलीस निरीक्षक श्याम बुवा यांनी मोकाट जनावरांबाबत कारवाईसाठी आवश्यक कायदेशीर तरतुदी उपलब्ध असल्याचे सांगितले. अधिकृत तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून तत्काळ कारवाई करण्यात येईल. तसेच शहर सुरक्षा दल स्थापन करून त्यामार्फत मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम राबविण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
सभेत अखेरीस नेनेनगर येथे तात्पुरता कोंडवाडा सुरू करणे, टेंबवली येथे कायमस्वरूपी कोंडवाडा उभारण्यासाठी प्रयत्न करणे, शहर सुरक्षा दल स्थापन करणे, मोकाट गुरे पकडण्यासाठी स्वतंत्र पथक नेमणे तसेच पकडलेली गुरे शक्य असल्यास गोशाळेत पाठविणे, असे महत्त्वाचे निर्णय एकमताने घेण्यात आले. गुरे पकडणाऱ्या पथकात मानधन तत्त्वावर राजू कावले आणि सुभाष धुरी यांची नियुक्ती करण्याचाही निर्णय सभेत घेण्यात आला.
