रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलचा पदभार समारंभ दिमाखात; प्रा. सुप्रिया नलावडे अध्यक्षपदी
समाजोपयोगी व्यक्तींचा गौरव, नव्या कार्यकारिणीचा पदभार स्वीकार; शिक्षण, आरोग्य, पर्यावरण व सामाजिक सेवेला प्राधान्य देण्याचा निर्धार
कणकवली :
रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलचा पदभार समारंभ अलंकार हॉल, जानवली येथे उत्साहपूर्ण वातावरणात आणि मोठ्या दिमाखात पार पडला. गणेश स्तवन व ‘कौसल्येचा राम’ या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर राज नलावडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी रोटरी क्लबच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. नगरसेविका व इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या प्राध्यापिका रो. सुप्रिया नलावडे यांची अध्यक्षपदी निवड झाली. सचिवपदी रो. डॉ. अमेय मराठे, खजिनदारपदी रो. डॉ. प्राजक्ता नाचणे, उपाध्यक्षपदी रो. तृप्ती कांबळे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला. तसेच नव्या कार्यकारिणीतील सर्व सदस्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून वाई येथील पी.डी.जी. स्वाती हेरकर उपस्थित होत्या. त्यांनी रोटरीच्या माध्यमातून समाजोपयोगी व प्रभावी प्रकल्प कशा पद्धतीने राबविता येतील, याविषयी मार्गदर्शन केले.
मावळते अध्यक्ष ॲड. राजेंद्र रावराणे यांनी गेल्या वर्षभरातील कार्याचा आढावा घेत आरडीसी मीट, आयडियल स्टडी ॲपचे मोफत वाटप, करिअर मार्गदर्शन, ज्येष्ठ नागरिक दिन, स्वच्छता अभियान आदी विविध उपक्रमांची माहिती दिली.
नूतन अध्यक्ष रो. सुप्रिया नलावडे यांनी आपल्या मनोगतात ‘सर्वांसाठी सेवा’ हेच आपल्या कार्याचे ध्येयवाक्य असल्याचे सांगितले. क्लबमधील प्रत्येक सदस्याच्या कौशल्याचा व अनुभवाचा उपयोग करून शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन, महिला व बालकल्याण, युवक विकास आणि सामाजिक जागरूकता या क्षेत्रांत प्रभावी सेवा प्रकल्प राबविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सेवेचा स्पर्श पोहोचविणे हेच रोटरीच्या कार्याचे खरे यश असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल संदीप राणे यांना ‘फोर वे टेस्ट’ सन्मान देण्यात आला. हॉटेल व्यवसायातील योगदानाबद्दल दत्ता शंकरदास व महेश शंकरदास यांना ‘बिझनेस एक्सलन्स’ पुरस्काराने गौरविण्यात आले. कणकवली शहर स्वच्छ ठेवण्यासाठी योगदान देणारे प्रकाश राठोड, विनोद कांबळे व समीर मोरे यांना ‘व्होकेशनल अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला.
कै. रवींद्रनाथ मुसळे यांच्या स्मरणार्थ पुरस्काराने नुकतेच केंद्रप्रमुख पदावरून सेवानिवृत्त झालेले विजय भोगले गुरुजी यांचा गौरव करण्यात आला. मूकबधिर असूनही चित्रकलेत उल्लेखनीय कार्य करणारे स्वप्निल पांडुरंग पाटणकर यांनाही ‘व्होकेशनल अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले.
रोटरी परिवारातील शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश मिळविलेल्या अबीर मराठे, शौर्य नाचणे, आर्या तायशेटे, नित्यानंद मुरकर, अभिषेक राणे, स्वराली कदम आणि निर्झरा बांदेकर यांचाही सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला असिस्टंट गव्हर्नर संजय रावराणे, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी प्रणय तेली, तसेच देवगड, खारेपाटण, वैभववाडी, मालवण, कुडाळ, ओरोस, सावंतवाडी, वेंगुर्ला, शिरोड आणि बांदा येथील रोटरी पदाधिकारी, कणकवलीतील अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व रोटेरियन सदस्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालनाची जबाबदारी रो. राजेश कदम, रो. स्नेहलता राणे आणि रो. मेघा गांगण यांनी पार पाडली. कार्यक्रमाच्या शेवटी सचिव रो. डॉ. अमेय मराठे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
