You are currently viewing आठवणीतला पाऊस
Oplus_16908288

आठवणीतला पाऊस

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा श्रीशब्द लालित्य समूहाच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लघुलेख*

 

*’आठवणीतला पाऊस’*

 

मनाचा आठवांचा कोपरा आणि दरवर्षी येणारा पाऊस यांचे नाते चिरंतन आहे.

पहिला पाऊस आला कि, मन गहिरं होतं. एकेक पावसातल्या आठवणी फेर धरत झिम्मा खेळू लागतात.मन हळूवार होतं.

अंधारून येतं वारा सुसाट सुटतो. कृष्णमेघ ओथंबून आभाळ खाली येतं.

ढगांचा गडगडाट, वीजांचा कडकडाट होतो आणि माऊलीच्या दुधापरी धरतीवर मृगनक्षत्राचे तुषार शिडकतात. मन प्रसन्न होतं . वैषाख वणवा तात्पुरता शांत होतो. तोच मृदगंध पसरतो आणि मन वेडाऊन जाते.

आठवते ती सांजवेळ, नदीकिनारा आणि तो बांधावरचा प्रितीचा संकेत. नुकताच वळवाचा पाऊस पडुन गेलेला असतो. मृदगंध पसरलेला असतो. आणि आम्ही दोघे खुळावलेले तात्काळ या ठिकाणी भेटतो.

आणा भाका होतात अन् रोजच त्या बांधावर प्रितीचे चांदणे सांडायला लागते. पावसाची साथ संगत असतेच.

पुढे तो परदेशी निघून जातो. येतो येतो करत दोन तीन वर्षे जातात. मग निमूटपणे जन्मदाते ठरवतात व ती लग्न करून मोकळी होते.

मनाला लागते ही फसवणुक. प्रत्येक पावसात पहिल्यांदा हीच आठवण मनाला गहिरं आणि डोळे ओले करून जाते.

मन शांत झाले कि पहिल्या पावसात मला बोट धरून भिजायला व स्वत:भिजणारी आजी आठवतेच. ती म्हणायची ते माहेरच्या आठवणीचे तिचे गाणे आजही पाठ आहे.

स्वत:भिजत आपले डोळ्यातले पाणी ती पावसात वाहुन देत असेल असं आज वाटतं.

मनाच्या आठवणींच्या हिंदोळ्यावर झोके घेतात पावसातल्या आम्हा बाल सोबत्यांच्या गोड आठवणी मन त्यात गुंतून जाते. पहिला पाऊस आणि मैत्रिणी… त्याही खट्याळ.. पावसाचे पाणी एकमेकींवर ऊडवणार्या,…. पाण्यात कागदी होड्या सोडणार्या,… पूर्णपणे सचैल भिजणार्या . आनंदी सख्या आता प्रत्येक पहिल्या पावसात आठवतात व गावोगावी फोनवर ते बालपण आठवतात.

पहिल्या पावसात डोळ्यासमोर ऊभा रहातो बेधूंद पाऊस, वनात केकारव करणारे मोर, शेतं आणि त्यात साठलेले पाणी, स्वत:कष्ट करणारा बळीराजा व त्याची जिवाला जीव देणारे बैल. किती स्वप्न बघत असेल तो लेकरांसाठी!

पहिल्या पावसात आठवतो तो प्राजक्ताचा सडा, मोगरा गुलाब, सोनचाफा, जाईजुई अनंत तगर असे कित्येक फुलांचे बहर, सुवासाचा घमघमाट,तो देखणा सौंदर्याने नटलेला श्रावण, पहिली मंगळागौर जिवतीचे आईने आम्हाला केलेले औक्षण, पुरणपोळ्या आणि खपणारी .. ‘ती’आणि ‘तीच. डोळे भरून येतातच पहिल्या पावसात ‘तिला व तिच्या मायेला’आठवताना.

पहिल्या पावसात कवीवर्य कालीदास व मेघदुत आठवते व मजा येते.

पहिल्या पावसात जोडीदाराची आतुरता तो आज नसताना काळिज कुरतडून टाकते. त्याच्याबरोबरचे अवखळ रेशीम गाठीचे सोनेरी क्षण आठवून अधिकच मन हळवे होते.

पहिला पाऊस असंख्य आठवणींचा झिम्मा घेऊन येतो. तोच पाऊस त्याच आठवणी.. पण आनंद दरवर्षी वेगळाच असतो.

पहिला पाऊस कधी हंसवतो कधी लाजवतो तर कधी रडवतो सुद्धा.

मधेच पाऊस झिम्माड होतो आणि मनही जास्तच झोके घेते.

पाऊस थांबतो व आठवणींचा कवडसा मनाच्या कोपर्यात चांदवा बनुन लपतो.

सगळं धुसर दिसेनासे होते.

पाऊस आपल्या वाटेने निघून जाते व मनही संसारात जूंपले जाते.

पण पहिला पाऊस हा आठवणींचा पेटारा घेऊन येतो तो हवाहवासा वाटतो.

 

अनुराधा जोशी.

अंधेरी मुंब ई 69

9820023605

प्रतिक्रिया व्यक्त करा