भंडारी समाजासाठी ३० मे रोजी कट्टा येथे बँकिंग रोजगार मेळावा
असिस्टंट मॅनेजर पदांसाठी थेट मुलाखती; युवक-युवतींना सहभागी होण्याचे आवाहन
कुडाळ :
अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ आणि सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारी समाजातील युवक-युवतींसाठी विशेष बँकिंग रोजगार मेळाव्याचे आयोजन शनिवार, ३० मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता कट्टा येथे करण्यात आले आहे. मालवण तालुक्यातील ओम गणेश साई मंगल हॉल, पेट्रोल पंप नजीक, कट्टा येथे हा मेळावा होणार असून इच्छुकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्याबाबतची महत्त्वाची बैठक बुधवारी कुडाळ येथील सिद्धीविनायक मंगल कार्यालय, पेडणेकर हॉल येथे जिल्हाध्यक्ष हेमंत करंगुटकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीला कार्यकारिणी सदस्य, पदाधिकारी तसेच समाजबांधव उपस्थित होते.
या मेळाव्यात अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक सहभागी होणार असून असिस्टंट मॅनेजर पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. उमेदवारांसाठी कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण आवश्यक असून फ्रेशर्स तसेच अनुभवी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. वयोमर्यादा २१ ते २७ वर्षे ठेवण्यात आली आहे. उमेदवारांनी अद्ययावत बायोडाटा आणि शैक्षणिक प्रमाणपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे या मेळाव्यात लेखी परीक्षा न घेता थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया होणार असून निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ ऑफर लेटर देण्यात येणार आहे. तसेच १० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन आणि कौशल्य विकासावर विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहे.
दरम्यान, नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आलेले रुपेश अशोक पावसकर यांचा यावेळी जिल्हा भंडारी महासंघाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
बैठकीस जिल्हाध्यक्ष हेमंत करंगुटकर, कार्याध्यक्ष राजू गवंडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष समिल जळवी, माजी अध्यक्ष रमण वायंगणकर, प्रियदर्शन कुडव, विकास वैद्य, निलेश गोवेकर, लक्ष्मीकांत मुंडये, भरत आवळे, श्रीकांत वेंगुर्लेकर, प्रवीण आचरेकर, चंदन पांगे, गजानन वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते.
रोजगार मेळाव्यासाठी इच्छुक उमेदवारांनी खालील गुगल फॉर्म भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे :
https://forms.gle/rcamFkj8aMdy3GjQ8
अधिक माहितीसाठी हेमंत करंगुटकर (९४२३५१३६४७), रमण वायंगणकर (९६२३७२७९२०), समिल जळवी (९४२१२३५५०८), राजू गवंडे (९०६७४७४८९९) आणि प्रियदर्शन कुडव (९४२३३५२६२६) यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
