You are currently viewing जन्मत: 910 ग्रॅम वजन असलेल्या नवजात शिशूचें प्राण वाचविण्यात यश

जन्मत: 910 ग्रॅम वजन असलेल्या नवजात शिशूचें प्राण वाचविण्यात यश

जन्मत: 910 ग्रॅम वजन असलेल्या नवजात शिशूचें प्राण वाचविण्यात यश

 सिंधुदुर्गनगरी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे जन्मत: 910 ग्रॅम वजन असलेल्या नवजात शिशूचें प्राण वाचविण्यात यश मिळाल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अनंत डवगे यांनी दिली आहे.

        सावंतवाडी तालुक्यातील सांगेली, येथील अकाली जन्मलेल्या व जन्मत: 910 ग्रॅम एवढे अत्यंत कमी वजन असलेल्या नवजात बालिकेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे बालरोगचिकित्साशास्त्र विभागातील विशेष नवजात अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले होते. शिशूची प्रकृती अत्यंत चिंताजनक स्थितीमध्ये होती. सदर शिशु श्वासोच्छावास घेण्यास सुद्धा असमर्थ होते. अश्या परिस्थितीत विभाग प्रमुख डॉ. रामचंद्र नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिदक्षता कक्ष व बालरोग कक्षातील डॉक्टर्स व नर्सेस यांनी वैद्यकीय पद्धती नुसार तात्काळ सरफॅक्टट थेरपीचा वापर केला व बबल सी-पॅप मोड चा वापर करून सी-पॅप मशीनच्या साहाय्याने प्रकृतिमान सुधारण्याच्या  दृष्टीने तब्बल 2 महिने सातत्याने शिशुवर रात्रंदिवस उपचार करण्यात आले. शेवटी शिशूचे वजन 1500 ग्रॅम झाल्यानंतर व शिशू स्वबळावर जगण्यास समर्थ झाल्यामुळे त्यास रुग्णालयातून सुट्टी करण्यात आली. बाळाचे प्राण वाचविल्याबद्दल बाळाच्या पालकांनी रुणालयातील उपचार करणाऱ्या सर्व चमूचे विशेषतः डॉ. नागरगोजे यांचे आभार मानले. सद्यस्थितीत बाळाची प्रकृती स्थिर असून वजन हळूहळू वाढत आहे.

मिठबांव, तालुका देवगड येथील अकाली जन्मलेल्या व जन्मत: 2140 ग्रॅम एवढे कमी वजन असलेल्या नवजात बालिकेवर सुद्धा नुकतेच यशस्वीरीत्या उपचार करण्यात आले आहेत. या बालिकेला जठरातून रक्तस्त्राव होत होता. त्यावर यशस्वी उपचार करण्यात आले.

डॉ. रामचंद्र नागरगोजे यांच्या निगराणी खाली मागील 2 वर्षात अकाली जन्मलेल्या व 2500 ग्रॅम पेक्षा कमी वजन असलेल्या तब्बल 405 नवजात शिशूंवर यशस्वी उपचार करून त्यांचे प्राण वाचविण्यात यश मिळाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा