सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रिक्तपदांच्या पार्श्वभूमीवर देव्या सुर्याजी यांची मागणी
सावंतवाडी :
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेले वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांचा कार्यकाळ येत्या ३१ मे रोजी संपत असून, रुग्णालयातील अनेक रिक्त पदे व भेडसावणाऱ्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांना आणखी दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी रुग्ण कल्याण नियामक समिती सदस्य, आमदार प्रतिनिधी तथा नगरसेवक श्री. देव्या सुर्याजी यांनी केली आहे.
कोरोना काळात डॉ. उत्तम पाटील व डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांना जशी मुदतवाढ देण्यात आली होती, त्याच धर्तीवर डॉ. ऐवळे यांनाही सेवा सुरू ठेवण्याची संधी द्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.
१९९६ पासून डॉ. ऐवळे शासकीय सेवेत कार्यरत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांनी सर्वाधिक काळ सेवा बजावली आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील अपुऱ्या मनुष्यबळात व विविध अडचणींमध्येही त्यांनी रुग्णालयाची व्यवस्था सक्षमपणे सांभाळली असल्याचे श्री. सुर्याजी यांनी नमूद केले.
डॉ. ऐवळे निवृत्त झाल्यानंतर वैद्यकीय अधीक्षक पद रिक्त होणार असल्याने रुग्णालयाच्या प्रशासनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्यांना मुदतवाढ देण्याबाबत आरोग्यमंत्री श्री. प्रकाश आबिटकर यांचे पत्राद्वारे लक्ष वेधण्यात आले असून आमदार श्री. दीपकभाई केसरकर यांच्या माध्यमातूनही आरोग्य मंत्रालयाशी पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, अन्य कोणाच्या नावाचा वैद्यकीय अधीक्षक पदासाठी विचार झाला तर नुकतेच उपजिल्हा रुग्णालयात रुजू झालेले आणि २४ तास रुग्णसेवेसाठी तत्पर असलेले फिजिशियन डॉ. विशाल रेड्डी यांचा विचार करण्यात यावा, अशी मागणीही श्री. सुर्याजी यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे केली आहे.
