नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन; ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया अधिक अचूक व जलद होणार
सिंधुदुर्गनगरी :
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे अत्याधुनिक ‘सी-आर्म’ मशीनचे लोकार्पण मत्स्यव्यवसाय व बंदरे तसेच पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमास आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे, आरोग्य सभापती प्रितेश राऊळ तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उपलब्ध करून देण्यात आलेले हे अत्याधुनिक मशीन अस्थिव्यंगोपचार विभागासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. ‘सी-आर्म’ तंत्रज्ञानामुळे हाडे व सांधे यांच्याशी संबंधित गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया अधिक अचूक, सुरक्षित आणि जलद पद्धतीने करता येणार आहेत.
विशेषतः अपघातग्रस्त रुग्ण, फ्रॅक्चर तसेच सांध्यांच्या शस्त्रक्रियांमध्ये या मशीनचा मोठा फायदा होणार असून, ऑर्थोपेडिक उपचारांची गुणवत्ता वाढणार आहे. यामुळे रुग्णांना आधुनिक वैद्यकीय सुविधा स्थानिक स्तरावर उपलब्ध होऊन वेळ, खर्च आणि श्रम यांची मोठी बचत होणार आहे.
