You are currently viewing नळपाणी योजनेच्या थर्ड पार्टी ऑडिटवरून वाद; विशेष सभा घेण्याची मागणी
Oplus_16908288

नळपाणी योजनेच्या थर्ड पार्टी ऑडिटवरून वाद; विशेष सभा घेण्याची मागणी

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या तांत्रिक लेखापरीक्षण अहवालावर प्रश्नचिन्ह; उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांचा आक्षेप

सावंतवाडी / (प्रतिनिधी) : सावंतवाडी नगरपरिषदेच्या ५७ कोटींच्या नळपाणी योजनेच्या थर्ड पार्टी ऑडिट अहवालावरून वाद निर्माण झाला आहे. या अहवालावर सविस्तर चर्चा करण्यासाठी विशेष सभा आयोजित करण्याची मागणी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी केली आहे. तांत्रिक लेखापरीक्षण करणारे सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणे येथील सहयोगी प्राध्यापक डॉ. नामदेव हेराऊत हे विशेष सभेला अनुपस्थित राहिल्याने निरवडेकर यांनी, ‘प्रश्न कोणाला विचारायचे?’ असा सवाल उपस्थित केला.

या विषयावर सविस्तर चर्चा व्हावी, यासाठी विशेष सभा पुन्हा आयोजित करण्याची मागणी निरवडेकर यांनी केली आहे. ते सभेला ऑनलाइन उपस्थित होते. मात्र, ऑनलाइन जोडणीतील तांत्रिक अडचणींमुळे सभेतील संवाद स्पष्टपणे ऐकू येत नव्हता. त्यामुळे नळपाणी योजनेच्या तांत्रिक अहवालावर योग्य प्रकारे चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

सादर करण्यात आलेला तांत्रिक लेखापरीक्षण अहवाल एप्रिल २०२६ पर्यंतच्या कामावर आधारित आहे. मात्र, योजनेतील कथित अनियमिततांबाबत आपण १ जुलैला अधिकृत पत्र दिले होते. त्यामुळे एप्रिलनंतरच्या कामातील अनियमितता या अहवालात समाविष्ट नसल्याचा दावा निरवडेकर यांनी केला आहे.

नळपाणी योजनेत सर्व काही व्यवस्थित असल्याचे चित्र निर्माण करून केवळ औपचारिक सभा घेऊन जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून, हा प्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.

या संपूर्ण प्रकरणावर लवकरच पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याचे ॲड. अनिल निरवडेकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा