मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आमदार सुरेश धस यांच्यासमवेत केली रूटी तलावाची पाहणी
बीड :
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सर्वात मोठ्या रूटी तलावाची मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी करून अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेतला.
दुष्काळामुळे रूटी जलाशय पूर्णतः कोरडा पडला असून, यंदा येथील मत्स्योत्पादन शून्य टक्क्यांवर आले आहे. या परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या मच्छीमार बांधवांना शासनाकडून आवश्यक ती सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही मंत्री नितेश राणे यांनी दिली.
रूटी जलाशयात अपेक्षित असलेल्या ८७ टक्के मत्स्योत्पादनाच्या तुलनेत गतवर्षी ६२ टक्के मत्स्योत्पादन झाले होते. मात्र, यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे मत्स्योत्पादन पूर्णतः ठप्प झाले असून, संगोपन करण्यात आलेले मत्स्यबीजही नष्ट झाले आहे. त्यामुळे मत्स्यव्यवसायावर अवलंबून असलेल्या मच्छीमार बांधवांच्या उपजीविकेवर मोठा परिणाम झाला आहे. या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करताना मंत्री राणे यांनी मच्छीमारांशी संवाद साधून त्यांच्या समस्या व मागण्या जाणून घेतल्या.
रूटी जलाशयातील मत्स्योत्पादन पुन्हा वाढविण्यासाठी तलावात मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ काढणे आवश्यक आहे. यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेऊन सीएसआर निधीच्या माध्यमातून आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येईल, असे मंत्री राणे यांनी सांगितले. तसेच, शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य असल्याचे नमूद करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केले.
मच्छीमार बांधवांनी मांडलेल्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार मच्छीमारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी स्थानिक आमदार सुरेश धस, मत्स्य आयुक्त भानुदास पालवे, संबंधित अधिकारी आणि मच्छीमार बांधव उपस्थित होते.
