You are currently viewing जिल्हा बँकेच्या माध्यमातून कृषी पर्यटन केंद्रांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल – अध्यक्ष मनिष दळवी

जिल्हा बँकेच्या माध्यमातून कृषी पर्यटन केंद्रांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल – अध्यक्ष मनिष दळवी

सावंतवाडी :

 

निसर्गाचे महत्व पटल्याने त्याच्या सानिध्यात राहायला आता सर्वांनाच आवडते. जिल्ह्याच्या सह्याद्री पट्ट्यात तर निसर्ग सौंदर्याची खाण असून जगभरातील पर्यटकांना मोहिनी घालण्याची ताकद सह्याद्री पट्ट्यात आहे. सह्याद्रीतील हा अनमोल नजराणा जगासमोर येण्यासह त्याच्या पर्यटन विकासासाठी जिल्ह्यातील चार तालुक्यातील कृषी पर्यटन केंद्रे व निसर्ग प्रेमींनी एकत्र आले. ही खऱ्या अर्थाने जिल्ह्याच्या पर्यटन विकासाची नांदी असुन अशा संस्थांच्या शेती पूरक व्यवसायातून शाश्वत रोजगार उपलब्ध होणार आहे. जगभरातील पर्यटकांची पावलेही सह्याद्रीकडे वळणार आहे. त्यासाठी बँकेच्या माध्यमातून कृषी पर्यटन केंद्रांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी दिली.

सावंतवाडी, दोडामार्गसह वेंगुर्ले व कुडाळ तालुक्यातील कृषी पर्यटन केंद्र व निसर्गप्रेमींनी एकत्र येत स्थापन केलेल्या सह्याद्री कृषी पर्यटन सहकारी सेवा संस्थेच्या शुभारंभ प्रसंगी मनीष दळवी बोलत होते. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जिल्हा निबंधक सहकारी अधिक्षक सौ यु यु यादव, सहाय्यक निबंधक आरावंदेकर, संस्थेचे अध्यक्ष रामानंद शिरोडकर, संचालक प्रमोद सावंत, आनंद मेस्त्री, हिर्लोकच्या मामांचा गावचे अनंत सावंत, प्रवीण देसाई, माडखोल सरपंच सौ श्रृष्णवी राऊळ, कारिवडे सरपंच सौ आरती माळकर, कुणकेरी सरपंच सौ सोनिया सावंत, संचालक सौ विभावरी सुकी, भरत गावडे, जोश कन्नाई, नंदकिशोर दळवी, सुभाष भितये, ज्ञानेश्वर सावंत, मानद सचिव धर्माजी गावडे आदी उपस्थित होते.

यावेळी सौ यु यु यादव यांनी कृषी पर्यटन केंद्रासह निसर्गप्रेमी एकत्र आले ही जिल्ह्याच्या कृषि पर्यटन विकासाच्या दृष्टीने आशादायी आहे. संस्थेने आपले हे ध्येय कायम ठेवून मार्गक्रमण केल्यास पर्यटनाच्या माध्यमातून सह्याद्री पट्ट्याचा विकास होणार असल्याचे सांगितले. अनंत सावंत यांनी पर्यटन आणि कृषि पर्यटन यामध्ये फरक असल्याचे सांगून कृषि पर्यटनाच्या विकासासाठी कुणाच्या मदतीची अपेक्षा न करता परिस्थितीवर स्वतः मात करून पर्यटन सुविधा व दर्जा टिकवल्यास या व्यवसायात यश मिळणार असल्याचे सांगितले.

यावेळी प्रमोद सावंत यांनी युवकांनी उपलब्ध असलेल्या नैसर्गिक पर्यटनाचा उपयोग करून शेतीपूरक व्यवसाय म्हणून कृषी पर्यटनाकडे पाहण्याचे आवाहन करीत पर्यटन सुविधांसाठी जिल्हा बँकेने कर्जरूपी अर्थ पुरवठा उपलब्ध करण्याची मागणी केली. सोनिया सावंत यांनी कृषी पर्यटनात युवकांचा सहभाग वाढवण्यासाठी कृषी पर्यटन प्रशिक्षण शिबिराची आवश्यकता असल्याचे सांगून त्यानंतरच जिल्ह्यात खऱ्या अर्थाने कृषी पर्यटन बहरणार असल्याचे सांगितले.

कार्यक्रमांच्या प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष रामानंद शिरोडकर यांनी सह्याद्री पट्ट्यातील एकुण २७ कृषी पर्यटन व निसर्गप्रेमींनी एकत्र येत ही संस्था स्थापन केल्याचे सांगून संस्थेचा उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संचालक भरत गावडे यांनी तर आभार सौ विभावरी सुकी यांनी मानले.

यावेळी दिनेश चव्हाण, कुंभवडेचे विजय गावडे, सांगेलीचे विश्वनाथ राऊळ, केसरीचे प्रदीप सावंत, संदीप सुकी, सिद्धेश तायशेटे, चौकुळचे अरुण गावडे, वाफोलीचे मंथन गवस, श्री धरणे, सतीश गवस, इन्सुलीचे काका चराटकर, युक्ता सावंत, श्री तारी, मधुमती गावडे, अशोक माळकर, सुयोग राऊळ, नाना गावडे, विजय सावंत, धनराज चव्हाण आदी सावंतवाडी, वेंगुर्ले, दोडामार्ग, कुडाळ तालुक्यातील कृषी पर्यटन केंद्र चालक व निसर्गप्रेमी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा