सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेचे नोंदणी शुल्क माफ; आरटीओ पराग मातोंडकर यांची पुढाकार
एकाच दिवशी स्वखर्चाने रजिस्ट्रेशन पूर्ण; सेवाभावी कार्याला प्रशासनाची दखल
सिंधुदुर्ग :
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेच्या नोंदणीसाठी एक रुपयाही शुल्क आकारले जाणार नाही, अशी ठाम भूमिका आरटीओ अधिकारी पराग मातोंडकर यांनी घेतली आहे. प्रतिष्ठानचे काम कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण व्हावे, यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेत एकाच दिवशी रुग्णवाहिकेचे रजिस्ट्रेशन स्वखर्चाने करून दिले. या प्रक्रियेत कार्यालयातील कर्मचारी बाबू तळेकर यांनीही सहकार्य केले.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्याची दखल आता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही घेतली जात असून, अपघातग्रस्तांना तातडीने मदत करून जीव वाचवण्याच्या त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबाबत बोलताना पराग मातोंडकर म्हणाले की, “हे माझ्याकडून तुमच्या सामाजिक कार्यासाठी छोटंसं योगदान समजा. तुमचे कार्य ‘जीवनदूत’ म्हणून ओळखले जावे, यासाठी मी वरिष्ठांकडे शिफारस केली आहे.”
दरम्यान, प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा लवकरच होणार असून, त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची ग्वाहीही मातोंडकर यांनी दिली आहे. समाजासाठी वेळ देत गरजूंच्या मदतीला धावून जाणाऱ्या कार्यकर्त्यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
यावेळी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे आणि रवी जाधव यांनी पराग मातोंडकर यांचे आभार मानले. समाजाभिमुख दृष्टीकोन असलेले अधिकारी जिल्ह्यात येणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
