You are currently viewing श्री एकमुखी दत्त मंदिराचा २ एप्रिलला भव्य कलशारोहण सोहळा
Oplus_16908288

श्री एकमुखी दत्त मंदिराचा २ एप्रिलला भव्य कलशारोहण सोहळा

३० मार्च ते २ एप्रिल दरम्यान धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल; मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न होणार

 

सावंतवाडी :

सावंतवाडी- सबनीसवाडा येथील सुमारे ११० वर्षे पूर्ण झालेल्या श्री एकमुखी दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर येथे गुरुवार, २ एप्रिल २०२६ रोजी चैत्र शुद्ध पौर्णिमेनिमित्त भव्य ‘कलशारोहण सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीच्या वतीने ३० मार्च ते २ एप्रिल या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती उपसमितीचे अध्यक्ष दयानंद गवस यांनी दिली.

प.पू. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींच्या कृपेने मंदिराचे काम पूर्ण झाल्याने हा सोहळा आयोजित करण्यात येत आहे. सोमवार, ३० मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता भव्य कलश दिंडी मराठी शाळा क्र. ४ पासून प्रारंभ होऊन शहरातील मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करत मंदिरात रात्री आरतीने समाप्त होईल.

३१ मार्च रोजी सकाळी ८ वाजता शांतिपाठ, प्रायश्चित्त विधी, गणेश पूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, नांदीश्राद्ध आचार्यादि विधी होतील. तसेच प्राकारशुद्धी, देवतांचे आवाहन, पूजन, श्रींची आरती व महाप्रसाद होईल. सायंकाळी सौ. मंजिरी धोपेश्वरकर यांचा ‘भक्तिरंग’ कार्यक्रम तर रात्री नितेश मेस्त्री प्रस्तुत ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ हा नाट्यसंगीत व अंभंगवाणीचा कार्यक्रम होणार आहे.

बुधवार, १ एप्रिल रोजी सकाळी पवमान अभिषेक व होमहवन, त्यानंतर ९ वाजता तुलशीपूजन होणार आहे. दुपारी महाप्रसाद व सायंकाळी योगेश सावंत भोसले यांचा ‘स्वरसाद’ तसेच रात्री किरण सिद्धये संचित ‘स्वरधारा’ हा संगीताचा कार्यक्रम रंगणार आहे.

गुरुवार, २ एप्रिल रोजी मुख्य कलशारोहण सोहळा पार पडणार असून सकाळी देवता पूजन, हवन, शतकलशार्चन, शतकलशाभिषेक देवतांवर अभिषेक होणार आहे. दुपारी १२ वाजून १ मिनिटांच्या शुभ मुहूर्तावर कलशपूजन व कलशारोहण सोहळा संपन्न होईल. यावेळी अभिनव विद्या नृसिंह भारती संस्थान मठ संकेश्वर करवीर पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री सच्चिदानंद, प.पू. दत्तानंद भारती स्वामी महाराज (नृसिंहवाडी), प.पू. शरद जोशी महाराज (पुणे) तसेच माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या शुभ हस्ते कलशपूजन व कलशारोहण होणार आहे.

यानंतर दुपारी आरती व महाप्रसाद होईल. ह.भ.प. स्नेहलदीप प्रभाकर सामंत यांचे सुश्राव्य कीर्तन, श्रींची पालखी व रात्री ‘नादब्रह्म’ हा गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या सुवर्ण सोहळ्याचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा, असे आवाहन देवस्थान उपसमितीचे अध्यक्ष दयानंद गवस, सचिव खेमराज उर्फ बाबु कुडतरकर, खजिनदार सुधीर धुमे, सदस्य दीपक पटेकर, जितेंद्र पंडित, लतिका सिंग, विनायक पराडकर, अशोक कवठणकर, प्रमोद चिंचाळकर, विलास सावंत आदींनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा