*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा अध्यक्ष कोमसाप सावंतवाडी लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित अप्रतिम काव्यरचना*
*अष्टाक्षरी रचना*
*”ठाव मनाचा”*
साधी भोळीच राहिली
स्त्रीत्व जपून रमणी
कांता, अबला, वनिता
माता म्हणती जननी
उभ्या आयुष्यात तिने
किती सोसले चटके
केला प्रतिकार नाही
उरी गाडले हुंदके
दुःखे तळाशी मनाच्या
भार सर्व स्वतः वाही
भले भंडावून सोडा
मुळी दावणार नाही
आर्त वेदना, यातना
हास्या आड दडवते
ठाव मनाचा लागेना
गाली ज्योत्स्ना फुलवते
जन्म देतसे लेकरां
सुख सर्वस्वी पाहते
माता महान जगती
आयु अवघे वाहते
🖊️दीपक पटेकर (दीपी)
सावंतवाडी
८४४६७४३१९६
