‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अंतर्गत जिल्हास्तरीय मार्गदर्शन मेळावा;
सिंधुदुर्गनगरी येथे क्षमता बांधणी शिबीर व सांस्कृतिक कार्यक्रम
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसेच ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने क्षमता बांधणी शिबीर व सांस्कृतिक कार्यक्रमासह जिल्हास्तरीय मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, दि. 13 मार्च 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत ओरोस येथील शरद कृषी भवन, सिंधुदुर्गनगरी येथे होणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार असून खासदार नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच सर्वश्री आमदार निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, दीपक केसरकर, निलेश राणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या सुरूवात ‘बेटी बचाओ- बेटी पढाओ’ रॅली व दिंडीने होणार आहे. तसेच उपस्थित महिलांसाठी वैद्यकीय शिबीराचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे. या मार्गदर्शन मेळाव्यात डॉ. सुभाष दळवी हे ‘ताण-तणाव व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच महिलांच्या आरोग्य समस्यांवर डॉ. प्रियंका कासार- पाटील यांचे तर ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या विषयावर ॲङ प्रणिता कोटकर मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय महिलांच्या सहभागातून सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबूडकर, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव संपूर्णा गुंडेवाडी, महिला व बाल विकास विभाग, कोकण विभागाच्या विभागीय उपआयुक्त सुवर्णा पवार, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांचीही उपस्थिती राहणार आहे.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी अपर जिल्हाधिकारी शारदा पोवार आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बापू शिणगारे यांनी केले आहे.
