मिशन आयएएसचे संचालक डॉ.प्रा.नरेशचंद्र काठोळे,नागपूर विभागीय संचालक विलास वानखडे व प्रा .सतीश काळे यांनी युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केलेल्या नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील ठाणेगाव येथील प्रज्वल नासरेचा पुष्पगुच्छ, शाल, ग्रामगीता व सन्मानपत्र देऊन सन्मान केला.
यावेळी प्रज्वलचे आईवडील यांना सुद्धा सन्मानित करण्यात आले.लोककवी श्री सुरेश मलवे यांनी यावेळी आई आणि माणुसकी ही दोन गीते सादर केली.
वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे तालुक्यातील ठाणेगाव येथील प्रज्वल धनराज नासरे याने नुकत्याच जाहीर झालेल्या युपीएससी परीक्षेच्या निकालात भारतातून ६७७ वा रैंक घेत कारंजा तालुक्याच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे.
ग्रामीण भागात राहत असलेल्या व घरची सामान्य परिस्थिती असलेल्या प्रज्वलने या परीक्षेकरिता कुठेही कोचिंग लावले नाही.घरी राहून ऑनलाईन कोचिंग करून सतत अभ्यास करून त्याने हे यश मिळविले आहे. त्याचे पहिली ते पाचवी पर्यंतचे शिक्षण कारंजा येथील स्व.राजीव गांधी मेमोरीयल इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे झाले. पाचवीत असताना त्याने नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर पुढे सहावी ते बारावी पर्यंतचे त्याचे शिक्षण वर्धा जिल्ह्यातील जवाहर नवोदय
विद्यालय सेलू (काटे) येथे झाले. डॉ.होण्याची इच्छा मनाशी बाळगून त्याने नीट परीक्षेची तयारी केली परीक्षा देखील उत्तीर्ण केली.पण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात फ्री सीटवर प्रवेश मिळविण्यासाठी आवश्यक गुण त्याला मिळू शकले नाही.
या अपयशाने खचून न जाता त्याने नव्या ध्येयाने वाटचाल सुरूच ठेवली. भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अविरत प्रयत्न सुरु ठेवले. त्याने कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश न घेता मुक्त विद्यापीठातून बी.ए. व एम.ए. पूर्ण केले. शिक्षण सुरू असतानाच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. यापूर्वी त्याने दोन वेळा परीक्षा दिली. त्याला यशाचा जवळ जाऊन यशाने हुलकावणी दिली होती. तिसऱ्या प्रयत्नात त्याला हे यश प्राप्त झाले आहे.
