मुख्याधिकारी कार्यालयात अनुपस्थित..“ नगरपंचायतीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह…
“नगरसेवकांनाच दाद नाही तर सामान्य जनतेचे काय?
नगरसेविका अक्षता जैतापकर यांचा प्रशासनावर हल्लाबोल”
वाभवे-वैभववाडी :
वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रतिक थोरात हे गेल्या तीन ते चार महिन्यांपासून प्रशासकीय कामानिमित्त कार्यालयात भेटत नसल्याची तक्रार माजी नगराध्यक्षा तथा नगरसेविका सौ. अक्षता अरुण जैतापकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे.
सौ. अक्षता जैतापकर यांनी सांगितले की, नगरपंचायतीच्या विविध प्रशासकीय कामांकरिता त्या अनेक वेळा कार्यालयात गेल्या. मात्र त्या वेळी मुख्याधिकारी कार्यालयात नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आवश्यक माहिती मिळू शकली नाही. तसेच ते नेमके केव्हा कार्यालयात येतात किंवा कोणत्या दिवशी भेटू शकतात, याबाबतही कार्यालयाकडून स्पष्ट माहिती दिली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मुख्याधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला असता फोन उचलला जात नाही तसेच केलेल्या कॉलला कोणताही प्रतिसादही मिळत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
“नगरसेवकांनाच अशी वागणूक मिळत असेल तर सर्वसामान्य नागरिकांची काय परिस्थिती होत असेल?” असा संतप्त सवाल माजी नगराध्यक्षा तथा नगरसेविका सौ. अक्षता अरुण जैतापकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. तसेच नगरपंचायतीच्या कामकाजात पारदर्शकता व जबाबदारी असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
