You are currently viewing शासनाने वयोवृद्ध निवृत्त कर्मचाऱ्यांना लाभ देण्याबाबतचे आदेश द्यावेत…

शासनाने वयोवृद्ध निवृत्त कर्मचाऱ्यांना लाभ देण्याबाबतचे आदेश द्यावेत…

शासनाने वयोवृद्ध निवृत्त कर्मचाऱ्यांना लाभ देण्याबाबतचे आदेश द्यावेत…

सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी संघटनेचे सुरेश पेडणेकर व पदाधिकाऱ्यांची मागणी..

कणकवली

शासनाने वयोवृद्ध निवृत्त कर्मचाऱ्यांना लाभ देण्याबाबतचे ताबडतोब आदेश / सूचना कराव्यात.कोषागार कार्यालय जिल्हा सिंधुदुर्ग यांच्याकडे शासनाची जी निवृत्ती वेतन प्रणाली आहे ती तशीचेतशी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी तात्काळ लागू करण्यात यावीअशी मागणी केल्याची माहिती सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी संघटनेचे सुरेश पेडणेकर, चंद्रकांत अणावकर, सुधाकर देवस्थळी, बाबू परब, रमेश आर्डेकर, विजय मयेकर व सोनू नाईक यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात दिली आहे

महाराष्ट्र शासनाने विधिमंडळ अधिवेशनात जाहीर केल्याप्रमाणे ८० वर्षे व त्यापेक्षा अधिक वय असलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अधिकच्या निवृत्ती वेतनाचे दर सुधारित केले आहेत. यासाठी वित्त विभागाकडील शानिक्र.सेनिवे-२०२१/प्र.क्र.६४/सेवा-४, दि. १६/०१/२०२४ चा शासन निर्णय निर्गमित केला आहे. या शासन निर्णयानुसार वय वर्षे ८० ते ८५ पर्यंत मूळ निवृत्ती वेतनात २०%वाढ, वय वर्ष ८५ पेक्षा अधिक ते ९० वर्षे यांना ३०% वाढ, वय वर्षे ९० अधिक ते ९५ वर्ष मूळ निवृत्ती वेतनात ४०% वाढ, वय वर्षे ९५ पेक्षा अधिक ते १०० वर्षे यांना ५०% वाढ तर वय वर्षे १०० पेक्षा अधिक असणाऱ्या निवृत्त कम्रचाऱ्यांना त्यांच्या मूळ निवृत्ती वेतनात १००% वाढ मंजूर केली आहे. मात्र या शासन निर्णयानुसार मागील फरकाची रक्कम कोणतीही मिळणार नसून दि. ०१/०१/२०२४ पासून सुधारित निवृत्ती वेतनाचे लाभ देय ठरणार आहेत.
उपरोक्त शासन निर्णयानुसार हे लाभ जानेवारी २०२४ च्या सेवानिवृत्ती वेतनातून द्यावयाचे असल्याने तसेच सदरचा शासन निर्णय प्रशासनाकडे वेळीच उपलब्ध झाल्याने ही सुधारित वाढ याच महिन्यापासून प्रत्यक्ष लाभ देण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तसेच या वयाबाबतच्या नोंदी प्रशासनाकडे उपलब्ध असल्याने त्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांचे अर्ज येईपर्यंत वाट पाहू नये. वय वर्षे ८० अथवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांची अपवाद वगळता त्यांना याबाबी वेळीच कळणे, त्यासाठी अर्ज लिहिणे, तो अर्ज कार्यालयाकडे पोहोच करणे अथवा दुसऱ्यांमार्फत पाठविणे याबाबी त्यांच्या दृष्टीने अनेकप्रकारे अडचणीच्या ठरु शकतात. त्यामुळे संबंधित कार्यालयांनी या अर्जांची वाट न पाहता आपल्याकडील उपलब्ध दप्तर / नोंदींप्रमाणे प्रत्यक्ष लाभ द्यावा असे अपेक्षित आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. सिंधुदुर्ग यांनी शासनाने वयोवृद्ध निवृत्त कर्मचाऱ्यांना लाभ देण्याबाबतचे ताबडतोब आदेश / सूचना कराव्यात अशी विनंती आहे. अशा वरिष्ठ स्तरावरील सूचनांमुळे तात्काळ कार्यवाही होण्यास विलंब होणार नाही अशी अपेक्षा आहे. काही कार्यालये याबाबतची कार्यवाही त्वरित करतात परंतु काहींकडून अकारण विलंब केला जातो. तो होणार नाही याबाबतची दक्षता घेणे आवश्यक आहे.
कोषागार कार्यालय जिल्हा सिंधुदुर्ग यांच्याकडे शासनाची जी निवृत्ती वेतन प्रणाली आहे ती तशीचेतशी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी तात्काळ लागू करण्यात यावी. त्यामुळे अशाप्रकारच्या लाभाच्या नोंदी तात्काळ अपडेट होतात. कर्मचाऱ्यांचाही वेळ वाचतो त्यामुळे याप्रणालीचा लवकरात लवकर वापर करण्यास निवृत्ती कर्मचाऱ्यांकडून प्रशासनाला विनंती आहे.
अशी माहिती सुरेश पेडणेकर, चंद्रकांत अणावकर, सुधाकर देवस्थळी, बाबू परब, रमेश आर्डेकर, विजय मयेकर व सोनू नाईक यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा