सभापतीपदी हर्षदा वाळके, उपसभापतीपदी राजेश उर्फ सोनू सावंत यांची नावे निश्चित
कणकवली :
कणकवली पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड आज (९ मार्च) होणार असून या निवडीसाठी भाजपकडून नावे जवळपास निश्चित झाली आहेत. सभापती पदासाठी नांदगाव पंचायत समितीच्या बिनविरोध निवडून आलेल्या सदस्य हर्षदा वाळके यांचे नाव पुढे आले आहे. तर उपसभापती पदासाठी वरवडे पंचायत समितीचे सदस्य राजेश उर्फ सोनू सावंत यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
काही वेळातच भाजपकडून या नावांची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. कणकवली पंचायत समितीमध्ये १६ पैकी सर्व सदस्य हे भाजप-शिवसेना महायुतीचे असल्याने ही निवड बिनविरोध होण्याची शक्यता स्पष्ट आहे.
कणकवली पंचायत समितीत हर्षदा वाळके यांनी यापूर्वी सदस्य म्हणून काम केले आहे. तर राजेश उर्फ सोनू सावंत यांच्या पत्नी यापूर्वी पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. हे दोन्ही संभाव्य पदाधिकारी कट्टर राणे समर्थक मानले जात असून पंचायत समितीच्या कारभाराची धुरा त्यांच्या खांद्यावर सोपवली जाणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.
दरम्यान, ९ मार्च रोजी सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत सभापती व उपसभापती पदासाठी नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार आहेत. दुपारी ३ वाजता प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी केली जाईल. दुपारी ३ ते ३.१५ वाजेपर्यंत वैध उमेदवारांची नावे जाहीर केली जातील. ३.१६ ते ३.३० वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत असेल. त्यानंतर ३.३१ ते ३.४५ वाजेपर्यंत वैध उमेदवारांची अंतिम नावे जाहीर केली जातील.
दुपारी ३.४५ वाजल्यापासून मतदान घेण्यात येणार असून त्यानंतर मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येईल, असा निवडणूक कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी निश्चित केला आहे. सभापती पदाची निवडणूक झाल्यानंतर लगेचच उपसभापती पदाची निवडणूक घेण्यात येणार आहे.
